दीड महिन्यांनी मंदिर खुले, सप्तशृंगी मातेला पाहताच भाविकांनी हात जोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 02:50 PM2022-09-26T14:50:32+5:302022-09-26T15:00:59+5:30

प्रशांत खरोटे - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दि. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृंगी गड प्रशासन तसेच ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दि. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृंगी गड प्रशासन तसेच ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.

सोमवारी (दि. २६) सकाळी सात वाजता सप्तशृंगी देवी न्यासाच्या कार्यालयात श्री भगवतीच्या अलंकारांची विधिवत पूजा होऊन अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवीची पंचामृत महापूजा यजमानांच्या हस्ते होऊन, प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी सपत्नीक तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते महापूजा विधी संपन्ना झाला.

घटस्थापना करण्यासाठी भाविकांना परतीच्या पायऱ्यांजवळील भक्तांगण हॉल व होमकुंडाजवळ ट्रस्टने जागा उपलब्ध करून दिली आहे. दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर यंदा लाखो भाविक गडावर येण्याची शक्यता आहे. आज, मूर्ती संवर्धन केल्यानंतर दीड महिन्याने मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले

यंदा देवीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यास मनाई केल्याने चांदीच्या स्वतंत्र मूर्तीवर अभिषेक केला जात आहे. कोरोना नंतर उत्सव भाविकांच्या उत्साहात साजरा होत आहे. एस.टी.ने २५० गाड्या उपलब्ध केल्या असून नांदुरी येथून दर पाच मिनिटांनी गाडी सोडण्यात येत आहे. तर खासगी वाहनांना गडावर बंदी आहे.

देवीच्या मूर्तीचे नुकतेच संवर्धन करण्यात आल्याने मूळ रूपातील देवी दर्शनासाठी भाविक आतूर झाले होते, त्यानिमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी पाहायला मिळाली. यावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक, पोलीस दल, डिझास्टर मॅनेजमेंट, महिला व पुरुष होमगार्ड आदी नियोजन केले आहे.

मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने बंदूकधारी वीस सुरक्षारक्षक, भाविकांना राहण्यासाठी २०० खोल्या, भोजनालय व्यवस्था, धर्मार्थ दवाखाना आदी नियोजन पूर्ण झाले आहे. उद्यापासून खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली असून, रसवंती, खेळणी, बांगड्या, पेढेप्रसाद व सौंदर्य प्रसाधने अशा अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटून सज्ज ठेवली आहेत.