"त्याच" मेडिकलमधून औषधाची सक्ती नाही, रुग्णालयात मोठा फलक लावण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:01 AM2022-12-12T11:01:45+5:302022-12-12T11:13:00+5:30

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव जगाने पाहिला, त्याचसोबत वैद्यकीय क्षेत्रातील दुसरी बाजुही समाजासमोर आली. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली लूट, रुग्णांची आर्थिक लुबाडणूक याही गोष्टी मीडियातून, सोशल मीडियातून समोर आल्या.

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव जगाने पाहिला, त्याचसोबत वैद्यकीय क्षेत्रातील दुसरी बाजुही समाजासमोर आली. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली लूट, रुग्णांची आर्थिक लुबाडणूक याही गोष्टी मीडियातून, सोशल मीडियातून समोर आल्या.

त्यामुळे, वैद्यकीय क्षेत्रावरील व्यावसायिकरणाची नेहमीच चर्चा होताना दिसून येते. त्यातच, रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित रुग्णालयातील औषधे विक्री करणाऱ्या दुकानांतूनच औषधे खरेदी करण्याची सक्तीही करण्यात येते. यासंदर्भात आता, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी आदेश काढून निर्देश दिले आहेत.

रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठीची औषधे तेथीलच औषध दुकानातून खरेदी करण्यास कुणीही सक्ती करु शकत नाही, असे म्हणत आयुक्त अभिमन्यू काळे यांनी विभागीय सहायक आयुक्त औषधे, निरीक्षक यांनी ईमेल आणि पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.

९ डिसेंबर रोजी त्यांनी हे पत्र सर्वच विभागीय आयुक्तांना पाठवले आहे. त्यामध्ये, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १०४० व त्याअंतर्गत असलेला नियम त्यांनी सांगितला आहे.

त्यानुसार, रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधे खरेदी न करण्याबाबतची सक्ती करण्याचे आदेशच त्यांनी दिले आहेत.

विशेष म्हणजे यासंदर्भात संबंधित विभागीय आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांना यासंदर्भात मोठा फलकही लावण्याचेही आदेश दिले आहेत.

''रुग्णालयातील औषधी दुकानातूनच औषधे खरेदी करावी अशी सक्ती नाही, रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करू शकतात'' , अशा आशयाचे ठळक अक्षरातील फलक संबंधित रुग्णलयांनी सर्वांना दिसेल, अशा परिसरात लावावा, असेही या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाला वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत, त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हा आदेश जारी केला आहे.

अनेकदा रुग्णालयातील स्टाफ किंवा डॉक्टराकंडून औषधांची खरेदी ही रुग्णालयातील औषध दुकानांतूनच करावी, अशी सक्ती करण्यात येते. या

सक्तीमुळे रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो, तसेच काहीवेळा आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. त्यामुळे, विभागाचा हा आदेश रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा आहे.