Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:40 PM2022-08-12T15:40:38+5:302022-08-12T15:51:48+5:30

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व राखण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असून, गड मजबूत करण्याची उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी चतुर चाल खेळत शिंदे गटाला चितपट करून भाजपला शह देण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात औरंगाबादला झुकते माप देण्यात आलेय. भाजप आणि शिंदे गटाने १८ मंत्र्यांना संधी दिली. यामधील तीन मंत्री एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. त्यातही शिंदे गटाने औरंगाबादच्या चार आमदारांपैकी दोघांना मंत्री केलेय. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे औरंगाबादवर वर्चस्व राखण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंमध्ये संघर्ष सुरू आहे.

शिंदे यांच्या गटात गेलेले आणि ठाकरेंवर सातत्याने शिरसंधान साधणारे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची नाराजी दिसूनही आली आहे. त्यात ठाकरे गटाने आता संजय शिरसाटांना डिवचले. बंडखोरीनंतर संजय शिरसाट यांना औरंगाबादमध्ये नडणाऱ्या अंबादास दानवेंना उद्धव ठाकरेंनी पुढे केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सध्या औरंगाबादचे तीन मंत्री आहेत, त्यात दोघे शिंदे गटातील आहेत. पैठणचे आमदार संदिपान भुमरे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनाही शिंदेंनी मंत्री करण्यात आले आहे. ज्या औरंगाबादमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटात तीव्र संघर्ष आहे, तिथे या दोन मंत्र्यांना उत्तर म्हणून काही तरी निर्णय घेणे भाग होते, अशी चर्चा रंगली आहे.

ठाकरे गटातील शिवसैनिक आणि नेत्यांना बळ देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. उद्धव ठाकरेंना यासाठी अंबादास दानवेंची निवड केली आणि त्यांना विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता केले. ज्या दानवेंना ठाकरेंनी संधी दिलीय, ते दानवे एकेकाळी वादग्रस्त राजकारणामुळे चर्चेत असायचे आणि त्यांच्यावर शिवसेनेला निलंबनाची कारवाईही करावी लागली होती, असे सांगितले जात आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ज्या अंबादास दानवे यांना औरंगाबादमध्ये तीन मंत्र्यांना तगडी टक्कर देण्यासाठी पुढे केले आहे, त्यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २००० साली नगरसेवक म्हणून ते अजबनगर येथून निवडून आले. वादग्रस्त प्रकरणात पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे राजीनामाही द्यावा लागला. चार वर्षे पक्षात फक्त शिवसैनिक म्हणून काम करताना त्यांनी संयम राखला.

ऑक्टोबर २००४ मध्ये प्रभारी जिल्हाप्रमुख पदाच्या रुपाने निष्ठेचे फळ मिळाले. २० वर्षांच्या राजकारणात दानवेंना महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा अनुभव आहे. पक्षनिष्ठेचे फळ म्हणून विधानपरिषदेवरही त्यांना संधी देण्यात आली.

दानवेंना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण 'मातोश्री'वरून त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. शिवसेनेने औरंगाबादमधला मराठा नेता म्हणून दानवेंना पुढे आणले. २०१४ मध्ये त्यांना गंगापूरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. पण त्यांचा पराभव झाला.

सन २०१९ मध्ये त्यांना लोकसभा लढवायची होती. मात्र विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच तिकीट देण्यात आले. बंडखोरीनंतर औरंगाबादमध्ये अंबादास दानवे विरुद्ध संजय शिरसाट असा संघर्ष पाहायला मिळाला. दानवेंनी संजय शिरसाटांवर जहरी टीका केली आणि ठाकरेंना साथ दिली. ठाकरेंकडून कायमच अंबादास दानवेंना झुकते माप देण्यात आले. यावेळीही ते ज्या संजय शिरसाटांना नडले, त्यांच्या जिव्हारी लागेल असा निर्णय घेण्यात आला.

इकडे संजय शिरसाटांची संधी हुकली आणि तिकडे ठाकरेंनी दानवेंना विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता केले. औरंगाबादमध्ये परतल्यानंतर दानवेंचं जंगी स्वागतही करण्यात आले. औरंगाबादचं राजकारण शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षामुळे गाजणार आहे. कारण, दोन्ही बाजूला दिग्गज नेत्यांची फौज आहे आणि महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे.

त्यातच औरंगाबाद लोकसभेची जागाही जिंकण्याचे आव्हान यावेळी शिवसेनेसमोर असेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. विशेष म्हणजे इथे एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. त्यांनी खैरे यांच्यावर निसटता विजय मिळवला.