भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी; चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:27 PM2022-08-21T20:27:40+5:302022-08-21T20:39:24+5:30

राज्यात ५० आमदारांना सोबत घेऊन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ठाकरे सरकार अल्पमतात आले. बहुमत गमावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून पायउतार झाले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपासोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली.

राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता आगामी निवडणुकांकरिता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. त्यात २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी अटीतटीची आहे. या निवडणुकीत भाजपाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांना मिशन ४० प्लस देण्यात आले आहे. त्यात भाजपा राज्य संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले.

अलीकडेच देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. भाजपा राज्यात नंबर वन आहेच. परंतु पुढील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाची ही ताकद कायम ठेवण्यासाठी आणि नंबर वन भाजपा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे असं सांगत बावनकुळे यांनी सूत्रे हाती घेतली.

पहिल्यांदाच बावनकुळे प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्याठिकाणी भाजपा जिल्हा कार्यकारणीची बैठक घेत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक विधान केले. बावनकुळेंच्या या विधानावरून शिंदे गट आणि भाजपात पहिली ठिणगी पडल्याचं चित्र आहे. कारण मिशन भाजपा अंतर्गत बुलढाण्याचा पुढील खासदार कमळ चिन्हावरील असेल असा दावा बावनकुळेंनी केला.

मात्र ज्या बुलढाण्यात बावनकुळेंनी हे विधान केले. तेथील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिंदे गटात आल्यानंतर जाधवांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे बुलढाणा मतदारसंघाचे उमेदवार आपणच असू अशी आशा धरली आहे. मात्र बावनकुळेंच्या या विधानानं जाधवांचं टेन्शन वाढलं.

त्यात बावनकुळे यांच्या विधानावरून दोन्ही बाजूकडून प्रतिक्रिया येऊ लागली आहे. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, बावनकुळे यांनी भाषणात ओघाओघात भाजपाचा खासदार होईल असं म्हटलं असावं. कदाचित शिवसेना-भाजपाचा खासदार असेल असं त्यांना म्हणायचं असेल. परंतु जाणुनबुजून हे विधान केले असेल तर याबाबत वरिष्ठांना कळवण्यात आले आहे.

भविष्यात अशी विधानं येऊ नये. ज्याठिकाणी शिवसेनेचा आमदार, खासदार आहे. आणि ते सध्याच्या शिवसेना-भाजपा युतीसोबत आहे. त्याठिकाणी युतीची भाषा वापरावी. अशी वक्तव्ये करू नये असं वरिष्ठांना सांगितले आहे. वरिष्ठांनी संबंधितांना समज द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली.

मात्र यावर वादावर भाजपा खासदार रामदास तडस म्हणाले की, २०२४ मध्ये राज्यात भाजपाची सत्ता येईल. शिंदे गटासोबत आमची युती आहे. जर शिंदे गटाला तिकीट मिळाली तर युतीचा खासदार निवडून येईल. जर तडजोड झाली तर दुसऱ्या मतदारसंघात प्रतापराव जाधवांना पाठवू. किंवा त्यांना तिकीट मिळाली तर त्यांना जिंकवू असं तडस यांनी सांगितले.

राज्यात सत्तांतर होताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे विधानसभेतील ४० आमदार आणि लोकसभेतील १२ खासदार गेले आहेत. सध्या शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार राज्यात आहे. परंतु शिंदे गटातील अपात्र आमदारांबद्दल अद्याप सुप्रीम कोर्टात विषय प्रलंबित आहेत. बहुमत आमच्याकडे असून आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

परंतु भविष्यात सुप्रीम कोर्टात जर विरोधात निकाल गेला तर शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे. खरी शिवसेना कुणाची हा मुद्दाही निकाली लागेल. त्यामुळे जर दोन तृतीयांश बहुमत असेल तर तो वेगळा गट बनून राहू शकत नाही तर त्यांना एखाद्या पक्षात विलीनीकरण करावं लागेल असं वारंवार सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या वकिलांकडून दावा करण्यात येत आहे. त्यात लोकसभा निवडणुकीवरून शिंदे गट आणि भाजपात पहिलीच ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे.