या मगरीने आतापर्यंत घेतला 300 लोकांचा बळी, स्थानिकांनी 'सीरियल किलर' असे नाव दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 02:34 PM2022-11-21T14:34:29+5:302022-11-21T14:38:24+5:30

गेल्या 100 वर्षांपासून या मगरीचे भय स्थानिकांमध्ये आहे.

Man Eater Crocodile: पाण्यात राहून मगरीशी वैर करायचे नाही, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पाण्यात मगरीशी कुणीच सामना करू शकत नाही. मगरीच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

अशीच एक मगर पूर्व आफ्रिकेत वास्तव्यास असून, तिने आतापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांना मारले आहे. तिला पकडण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, पण ही मगर काही कोणाच्या हाती आली नाही.

या 20 फूट लांब मगरीचे नाव गुस्ताव असून, पूर्व आफ्रीकेच्या बुरुंडीमधील तांगानिका तलावात या मगरीचे वास्तव्य आहे. स्थानिकांमध्ये या मगरीची प्रचंड दहशत आहे. बुरुंडीचे नागरीक या मगरीला खूप घाबरतात.

या मगरीचे वय किती, याबाबत ठोस माहिती नाही. पण, काहींच्या म्हणण्यानुसार, ही मगर 100 वर्षांची आहे. ही मगर अजूनही जिवंत असून, पुढील शिकारीच्या शोधात आहे, असे अनेकांचे म्हणने आहे.

आतापर्यंत अनेकांनी या अजस्त्र मगरीला मारण्याचे प्रयत्न केले, पण दरवेळेस मगर वाचली. गुस्तावला अद्याप कुणीच पकडू शकले नाही, त्यामुळे तिचा आकार आणि वजबाबत अनेकांची वेगवेगळी मते आहेत.

2002 मध्ये सांगण्यात आले होते की, ही मगर 18-20 फूट (5.5 मीटर) पेक्षा अधिक लांब आणि 2,000 पाउंड (910 किलोग्राम) वजनाची आहे. नॅशनल जिओग्राफिकनुसार, 1987 पर्यंत या मगरीवर हल्ल्यांची प्रकरणे दाखल होती.

तिने आतापर्यंत शेकडो आदिवासिंवर हल्ले केले आहेत. तिला लोकांनी सीरिअल किलर म्हणून घोषित केले होते. या मृत्यूमागे ती एकच मगर होती की अजून कोणती मगर होती, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. या मगरीच्या डोक्यावर एक खुण आहे, जी स्थानिकांना चांगलीच लक्षात आहे.

ही खुण बंदुकीच्या गोळीची असल्याचे काहींचे म्हणणे आहे. कॅप्चरिंग द किलर क्रोक (Capturing the Killer Croc) नावाच्या 2004 च्या एका डॉक्यूमेंट्रीमध्ये या मगरीला पकडण्याचा प्रयत्न दाखवण्यात आला होता. पण, ही मगर हाती आलीच नाही.