IT Raid: देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात, IT रेडने उद्योगविश्व हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 02:26 PM2022-08-11T14:26:17+5:302022-08-11T14:42:18+5:30

IT Raid: उद्योग, व्यापारात आघाडीवर असलेल्या जालन्यातील उद्योजकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या ससेमिऱ्याने उद्योगविश्व हादरले आहे. गेल्यावर्षी देखील चार स्टील उद्योजकांवर प्राप्तिकरचे छापे पडले होते.

उद्योग, व्यापारात आघाडीवर असलेल्या जालन्यातील उद्योजकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या ससेमिऱ्याने उद्योगविश्व हादरले आहे. गेल्यावर्षी देखील चार स्टील उद्योजकांवर प्राप्तिकरचे छापे पडले होते.

त्यात ३०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली होती. त्याच धर्तीवर गेल्या आठवड्यात जालन्यातील दोन स्टील उद्योजक, तसेच व्याजाने उद्योजकांना पैसे पुरविणाऱ्या फायनान्स ब्रोकरवर प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई करून खळबळ उडवून दिली आहे.

नुकत्याच झालेल्या कारवाईत तीनशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याने त्याची व्याप्ती मोठी असल्याचे सूत्रांनी सांगितले. जालन्यातील स्टील उद्योगात जवळपास 4 ते 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात होते. येथे स्टील उत्पादन म्हणजेच घरबांधणीसाठी लागणाऱ्या लोखंडी सळया निर्मितीचे 14 मोठे आणि 22 लहान कारखाने आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा एकूण 20 हजार जणांना यामुळे रोजगार मिळाला असून, कोट्यवधी रुपयांचा प्राप्तिकर, जीएसटीचा वाटा मिळतो.

या कारखान्यांकडून वीज वितरण कंपनीला दर महिन्याला साधारणपणे 100 ते 150 कोटी रुपयांचा वीज बिलाचा भरणा होतो. यावरूनच या स्टील उद्योगाची व्याप्ती किती मोठी आहे, हे लक्षात येते.

महिन्याकाठी हजारो टन सळयांचे उत्पादन येथे होते. संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अन्य राज्यांत येथील स्टीलला मोठी मागणी असते.

परंतु गेल्या वर्ष-दोन वर्षांत येथील उद्योजक प्राप्तिकर तसेच जीएसटीच्या ससेमिऱ्याने हैराण आहेत. सहा ते आठ महिन्यांपूर्वी जीएसटीच्या नाशिक येथील पथकाने आठवडाभर जालन्यात तळ ठोकून तपासणी केली होती. ई-वेबिलाचा मुद्दाही यावेळी गंभीरतेने घेतला गेला.

वर्षभरापूर्वी म्हणजेच गेल्या सप्टेंबरमध्ये जालन्यातील चार मोठ्या स्टील उत्पादकांच्या घरी तसेच कंपन्यांवर छापे टाकले होते. त्यात रोकड, दागिने आणि अन्य अशी मिळून जवळपास 300 कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड झाल्याचे प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले होते.

प्राप्तिकरचे रिटर्न भरण्याची 31 जुलै ही अंतिम तारीख संपते न संपते तोच तीन ऑगस्टला या विभागाच्या शंभरपेक्षा अधिक कारमधून विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून 300 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी दोन स्टील उद्योजक, तसेच फायनान्सरवर छापे टाकले. त्यातून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघड होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, या धाडीमुळे मराठवाड्यातील उद्योगविश्वाला मोठा हादरा बसला असून व्यापाऱ्यांमध्ये तपास यंत्रणांच्या धाडीची भीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, करचुकवेगिरीला आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, प्राप्तीकर विभागाकडून यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्यात येणार आहे.