चीनसोबत युद्ध झालं तर...; रशियाचा सीक्रेट प्लॅन उघड, पुतिन यांनी आखली योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:37 AM2024-03-01T11:37:50+5:302024-03-01T11:42:21+5:30

रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याची योजना उघड झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. रशियाच्या या सीक्रेट प्लॅनमध्ये चीनचाही उल्लेख आहे. चीनसोबत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास रशियाही अणुबॉम्बने हल्ला करू शकतो असं यात म्हटलं आहे.

रशियाचा सीक्रेट प्लॅन २००९ ते २०१४ दरम्यान तयार करण्यात आला होता. त्यावेळीही व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. चीन रशियाचा पूर्व प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो असं म्हटलं आहे. या मोठ्या खुलाशानंतर चीनने आता मौन बाळगले आहे

युक्रेन युद्धानंतर रशिया आणि चीन या दोन्ही देशांमध्ये नो लिमिटवाली मैत्री असल्याचा दावा केला आहे. परंतु रशियाच्या खुलाशानंतर आता चीन सरकारला धक्का बसला आहे.फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, पुतीन यांच्या सैन्याने अशा कोणत्याही चिनी हल्ल्याला तोंड देण्यासाठी अनेकवेळा प्रतिहल्ल्याचा सरावही केला आहे.

जर शत्रूने सैन्य तैनात करण्याचा आणि दक्षिणेकडून मुख्य हल्ल्याच्या दिशेने पुढे जाण्याची धमकी दिली त्या पार्श्वभूमीवर' 'कमांडर-इन-चीफने अण्वस्त्रांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटिश वृत्तपत्राने रशियन दस्तऐवजाचा हवाला देत म्हटले आहे.

रशियाच्या पूर्व लष्करी जिल्ह्याने चीनच्या हल्ल्याचा समावेश असलेल्या विविध परिस्थितींसाठी सक्रियपणे तयारी केली आहे, रशियाच्या संरक्षण धोरणात त्याच्या आण्विक शस्त्रागाराची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे. हे चीनशी एक जटिल संबंध सूचित करते, जिथे सार्वजनिक युती संघर्षासाठी खाजगी तयारीसह एकत्रित केली जाते.

सध्या अनेक देशांत युद्धे सुरू आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेन आमनेसामने आहेत. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. याशिवाय इतर अनेक देशांमधील संबंधही सध्या तणावाचे आहेत. जगभर सुरू असलेल्या या तणावाचं रुपांतर तिसऱ्या महायुद्धातही होऊ शकते असं बोललं जाते.

तिसरे महायुद्ध झाले तर अण्वस्त्रांचाही वापर केला जाईल. अशा परिस्थितीत अनेक देशांचे अस्तित्व नाहीसे होणार हे निश्चित मानले जाते. त्यात फायनान्शिअल टाईम्सनं रशियाचा सीक्रेट प्लॅन उघड करून जगाची चिंता वाढवणारा रिपोर्ट समोर आणला आहे

लीक झालेल्या फायलींनुसार, रशिया जी अण्वस्त्रे वापरणार आहे त्यामुळे संपूर्ण शहरे नष्ट होणार नाहीत. रशियन सैन्य आपल्या अण्वस्त्रांनी किती विध्वंस करेल हे या अहवालात सांगण्यात आले आहे. जर रशियाच्या २० टक्के बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या नष्ट झाल्या तर ते अण्वस्त्रांचा वापर सुरू करेल असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दस्तऐवजानुसार, जर रशियाचे तीन एअरफिल्ड नष्ट झाले तर ते अणुहल्ला करतील. एवढेच नाही तर ३० अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या नष्ट केल्या तरी रशिया अण्वस्त्र हल्ले करण्यास सुरुवात करेल

दस्तऐवजातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ते कोणत्या परिस्थितीत चीनवर अण्वस्त्र हल्ला करू शकतात याचा उल्लेखही करण्यात आलाय. रिपोर्टनुसार, चीन आणि रशियामध्ये युद्ध झाल्यास रशिया चीनला रोखण्यासाठी टॅक्टिकल अण्वस्त्रांचा वापर करू शकतो.