Russia Ukraine War: आता झाडूवरून उडा! रशियाचा अमेरिकेवर पलटवार; निर्बंधावरून घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:15 PM2022-03-04T14:15:08+5:302022-03-04T14:22:25+5:30

Russia has also decided to take revenge on America: अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर आता रशियानेही पलटवार करण्यास सुरुवात केली आहे.

रशिया यूक्रेन युद्ध सलग ९ दिवस सुरू आहे. परंतु अद्याप यूक्रेन ताब्यात घेणं रशियाला शक्य झालं नाही. यूक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियालाही मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. एकीकडे युद्धात सामुग्री नष्ट होतेय तर दुसरीकडे जगभरातून रशियावर निर्बंध लादले जात आहे.

नाटोसह अन्य देशांनी रशियाविरोधात कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे रशियावर मोठं आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात अनेक देश रशियाच्या विरोधात निर्णय घेत आहे. त्यामुळे आता रशियानंही अमेरिकेला चोख उत्तर देण्यास सुरूवात केली आहे.

रशियानं अमेरिकेवर पलटवार करत मोठा झटका दिला आहे. रशियानं अमेरिकेला रॉकेट इंजिन(Rocket Engines) पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन आंतरराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दिमित्री रोगोजिन(Dmitry Rogozin) याबाबत रशियन टेलिव्हिजनवर म्हणाले की, या स्थितीत आम्ही अमेरिकेला आमच्या द्वारे बनवण्यात येत असलेले सर्वश्रेष्ठ रॉकेट इंजिन(Rocket Engines) पुरवठा करू शकत नाही. त्यांनी झाडू अथवा अन्य गोष्टींवर उडावं असा टोला लगावला आहे.

रशियाने १९९० पासून यूएसला एकूण १२२ RD-180 इंजिनांचा(RD-180 Engines) पुरवठा केला आहे, त्यापैकी ९८ एटलस लाँच करण्यासाठी वीज देण्यात वापरण्यात आले आहेत. ते म्हणाले की, रॉसकॉसमॉस त्या रॉकेट इंजिनची सेवा देखील बंद करेल, जी यापूर्वी अमेरिकेला देण्यात आली होती.

यूएसमध्ये अद्याप २४ इंजिन आहेत, ज्यांना यापुढे रशियन तांत्रिक मदत दिली जाणार नाही. युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य निर्बंधांना उत्तर म्हणून फ्रेंच गयाना येथील कौरो स्पेसपोर्टवरून अंतराळ प्रक्षेपणावर रशियाने यापुढे युरोपला सहकार्य करणार नाही असे सांगितले आहे.

यासोबतच रशियाने ब्रिटीश सॅटेलाईट कंपनी वनवेबकडून आपल्या उपग्रहांचा लष्करी कामासाठी वापर केला जाणार नाही याची हमी देण्याची मागणीही केली आहे. रोगोजिन म्हणाले की, रशिया आता रॉसकॉसमॉस संरक्षण मंत्रालयाच्या गरजेनुसार दुहेरी-उद्देशीय अंतराळ यान तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

मॉस्कोने ब्रिटीश सॅटेलाइट कंपनी वनवेबकडूनही हमी मागितली आहे की त्याचे उपग्रह लष्करी कारणांसाठी वापरले जाणार नाहीत. ब्रिटीश सरकारच्या मालकीच्या वनवेबने गुरुवारी सांगितले की, ते कझाकिस्तानमधील रशियाच्या बॅकोनूर कॉस्मोड्रोममधून सर्व प्रक्षेपण स्थगित करत आहेत.

अमेरिकेने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर दबाव आणण्यासाठी प्रेस सेक्रेटरी पेस्कोव्ह यांच्यासह १९ रशियन दिग्गज आणि त्यांच्याशी संबंधित ५० लोकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. हे सर्वजण पुतिन यांचे खास मानले जातात.

युक्रेनचे दोन भाग करून रशियाने अमेरिकेसह नाटोला शह दिला असून आपले सैन्यही युक्रेनमध्ये घुसविले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे पाश्चात्य देशांमुळे करावे लागल्याचा आरोप केला होता. या विरोधात ब्रिटनने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली होती.