RRR Movie : गोल्डन ग्लोबमध्ये 'नाटू नाटू' चा डंका, 'टेलर स्वीफ्ट, लेडी गागाला' ही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 09:13 AM2023-01-11T09:13:47+5:302023-01-11T09:29:26+5:30

गोल्डन ग्लोबमध्ये RRR सिनेमातील 'नातू नातू' गाण्याने 'बेस्ट सॉंग'चा पुरस्कार मिळवत देशाचे नाव उंचावले. दोन दशकांनंतर गोल्डन ग्लोबमध्ये भारताला पुरस्कार मिळाला आहे. या गाण्याने ह़ॉलिवूडच्या स्टार गायिकांनाही हरवले.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे 2022 च्या हिट गाण्यांपैकी एक. या गाण्याचा डंका थेट अमेरिकेत ऐकायला मिळाला. भारतीय सिनेसृष्टीचे नावच RRR ने उंचावले आहे.

८० व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट सॉंगचा पुरस्कार मिळाला. संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी गाणे कंपोज केले होते. तर काला भैरवा आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणे लिहिले.

'नाटू नाटू' गाण्याने भारतीयांना तर थिरकायला लावलेच पण आता अमेरिकेतही या गाण्याला ओळख मिळाली. संगीत दिग्दर्शक कीरावानी स्टेजवर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचले तो RRR च्या टीमसाठी आणि समस्त भारतीयांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण होता.

'नाटू नाटू' गाण्याने हा पुरस्कार पटकावत हॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीत कलाकरांवर मात केली. मग समोर 'टेलर स्वीफ्ट' असो किंवा 'लेडी गागा'.

बेस्ट सॉंग या कॅटेगरीत 'नाटू नाटू' गाण्यासोबतच इतर गाण्यांना नॉमिनेशन होतं. टेलर स्वीफ्टचे कॅरोलिना, पिनोशियोचे ciao papa, टॉप गन मैवरिकचे होल्ड माय हॅंड, लेडी गागाचे लिफ्ट मी अप गाणे जे ब्लॅक पॅंथरमध्ये होते या सर्व गाण्यांचा नॉमिनेशन मध्ये समावेश होता. हॉलिवूडच्या दिग्गज संगीत कलाकारांवर भारताचे एम एम कीरावानी हे वरचढ ठरले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या RRR भारताचे नाव उंचावत आहे. ग्लोबल लेव्हलवर चित्रपटाने १२०० कोटींचा बिझनेस केला आहे. एस एस राजामौली यांच्या RRR ने ऑस्करमध्येही धडक दिली आहे.

गोल्डन ग्लोब मध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाच्या टीमने जोरदार सेलिब्रेशन केले. एस एस राजामौली, ज्युनिअर एनटीआर, रामचरण, एम एम कीरावानी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.