रिचर्ड एल. थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 06:03 PM2017-10-09T18:03:13+5:302017-10-09T18:06:40+5:30

अर्थशास्त्रामधील उल्लेखनीय योगदानासाठी रिचर्ड एच. थेलर यांना 2017 सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

अर्थशास्त्रामधील मानसिकतेचा सखोल अभ्यास करून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी थेलर यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला.

नोबेल समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'डॉक्टर थेलर हे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यातील संबंध यावर त्यांनी अभ्यास केला आहे'.

दरम्यान, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराराठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव चर्चेत होते. ‘क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स’ने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली होती. या यादीत रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला होता. रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता तर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते अमर्त्य सेन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरले असते.