पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावाचा भारताला फायदा; बॉर्डरवर काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 08:08 PM2023-11-24T20:08:15+5:302023-11-24T20:11:50+5:30

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध सातत्याने तणावग्रस्त बनत चाललेत. अफगाणिस्तानने पाकिस्तानातून येणारे हजारो ट्रक तोरखाम सीमेवर रोखून पाकिस्तानची कोंडी केलीय.पाकिस्तानने आश्रय घेतलेल्या अफगाण नागरिकांना देशातून बाहेर काढल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

अफगाणिस्तानने उचललेल्या या कठोर पाऊलामुळे पाकिस्तानला धक्का तर बसलाच पण यामुळे अफगाणिस्तानचा पाकिस्तानसोबतचा व्यापारही बंद झाला आहे.पाकिस्तान या खुल्या सीमेवरून भारतात अमली पदार्थांची खेप पाठवत असे असं आंतरराष्ट्रीय विषयाचे जाणकार सांगतात.आता बंद व्यापार करारामुळे अंमली पदार्थांची तस्करी आणि पाकिस्तानातून भारतात होणाऱ्या अवैध व्यापाराला आळा बसेल असं म्हटलं जात आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका दोन्ही देशातील व्यापाराला बसला आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने अफगाणिस्तानातून आलेल्या लोकांवर कठोर कारवाई सुरू केलीय. अफगाणिस्तानातून येणाऱ्यांना पाकिस्तानात व्हिसा बंदी केल्याचे समोर आले. अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे आक्षेप नोंदवल्यावर पाकिस्तानने दादागिरी करत अफगाणिस्तानचा व्यापार बंद करण्याची धमकी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळपासून अफगाणिस्तानने हजारो पाकिस्तानी ट्रकना देशात येण्यापासून रोखले. इतके नाही तर अफगाणिस्तानात असलेल्या सर्व ट्रकना पुढील काही दिवसांचा अवधी देऊन तात्काळ परतण्याचे आदेश दिले. असं करून अफगाणिस्तानने एकाच वेळी पाकिस्तानवर चहुबाजूने लक्ष्य केले असल्याचे तज्ज्ञ सांगतात

पाकिस्तानने त्यांच्या देशात राहणाऱ्या अफगाणी शरणार्थींना जबरदस्तीने आपल्या देशातून हाकलून देण्यास सुरुवात केली.आकडेवारीनुसार, आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक लोकांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानात पाठवण्यात आले आहे.यापैकी हजारो लोक असे होते जे केवळ अफगाणिस्तानातून कायदेशीररित्या पाकिस्तानात गेले नव्हते, तर शरणार्थी म्हणून छावण्यांमध्येही राहत होते.

परराष्ट्र व्यवहार तज्ञ निवृत्त कॅप्टन धीरज धारिवाल म्हणतात की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संबंध बिघडले. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडवण्याचे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली, जी अफगाणिस्तानने ओळखून पाकिस्तानवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली.

उत्तर तोरखाम सीमेवर थांबलेला व्यापार हे याचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे ते सांगतात.अफगाणिस्ताननं पाकिस्तानी ट्रक थांबवून त्यांचा व्यापारच रोखला नाही तर यामुळे पाकिस्तानातून भारतात अवैध ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठीही मोठे पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानातून अफगाणिस्तानात पाठवल्या जाणाऱ्या ट्रकमधून ड्रग्जची मोठी खेप पाकिस्तानात परत यायची असे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आयएसआय आणि त्यांचे सैन्य अफगाणिस्तानातून पाकिस्तानात ट्रकमध्ये येणारे अवैध ड्रग्ज मोठ्या हेतूने भारतातील सीमावर्ती भागात पोहोचवत होते.

भारतीय गुप्तचर संस्था आणि लष्करासह इतर एजन्सी देखील हे अवैध मादक पदार्थ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ अरविंद पुरोहित म्हणतात की, भारतातील वातावरण बिघडवण्यासाठी पाकिस्तान अफगाणिस्तानातून ड्रग्ज पुरवठा करतो. साठ टक्के ड्रग्ज पाकिस्तानी तस्कर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आणतात.

अफगाणिस्तानात पाकिस्तानातून व्यापारासाठी जाणाऱ्या ट्रकमधून अमली पदार्थांची सर्वात मोठी तस्करी होते.आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील व्यापार बंद होण्याची स्थिती दीर्घकाळ राहिल्यास भारतातील अवैध अमली पदार्थांच्या व्यापाराला मोठा फटका बसू शकतो.