चीनची भारताला धमकी; आम्हाला फरक नाही, चीनी सामानावर बहिष्कार आणण्याचं दूरच पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:54 PM2020-06-08T13:54:37+5:302020-06-08T13:57:52+5:30

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर तणाव वाढतानाच देशातील अनेक संघटनांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी Boycott Chinese Product अशाप्रकारे कॅम्पेन चालवलं जात आहे.

भारतातील या कॅम्पेनवर चीनने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. काही राष्ट्रवादी लोक आमच्या सामानाबद्दल अफवा पसरवत आहेत, पण चीनी मालावर बहिष्कार टाकणं इतकं सोप्प नाही. भारतीय समाजासाठी चीनी माल त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. जवळपास ७ हजार कोटींपेक्षा अधिक हा व्यवसाय आहे.

चीनी सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्समधून यावर भाष्य करण्यात आलं आहे. भारतातील काही संघटना चीनी मालाबाबत अफवा पसरवण्याचं षडयंत्र रचत आहेत. हे पहिल्यांदाच होत नाही, हा तोट्याचा व्यवहार भारताला परवडणारा नाही असं चीनने सांगितलं आहे.

चीनच्या तक्रारीनंतर गुगल प्ले स्टोअरवरुन रिमूव्ह चाइनीज एप हे हटवण्यात आलं आहे. या एप्लिकेशनमुळे स्मार्टफोनमधील चीनी अँप डिलीट होत होते, भारत-चीना सीमावाद गंभीर नाही जितका भारतातील काही विचारधारेचे लोक तो पसरवत आहेत.

चीनबाबत अनेक अफवा काही भारतीय राष्ट्रवाद करणाऱ्या नेत्यांकडून पसरवल्या जात आहेत. चीन आणि भारत यांच्यात गेल्यावर्षी ७ हजार कोटींचा व्यवहार झाला आहे. यात भारताने अनेक गोष्टी चीनमधून आयात केल्या आहेत.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत चीनी सामानाचा विरोध करुन मध्यम वर्गीय भारतीयांच्या डोक्यावर ओझं टाकण्यासारखं आहे. कारण भारतात कमीत कमी किंमतीत चीनच्या वस्तू आयात केल्या जातात.

भारतीयांना चीनी मालाचा बहिष्कार करणे शक्य नाही, भारताचा जीडीपी ग्रोथ वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हे शक्य होणार नाही. भारतीय स्मार्टफोन मार्केटमधील ७२ टक्के बाजारपेठ चीनी कंपनीच्या ताब्यात आहे. तर रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ ७०-८० टक्के चीनच्या हाती आहे.

चीनी मालाचा बहिष्कार आणि विरोध करणे कठीण आहे कारण व्यापक स्वरुपात चीनी सामान भारतीयांच्या जीवनाशी जोडले आहेत, त्याला बदलणं सहज शक्य नाही असं चीनने सांगितले आहे.

२०१८-१९ मध्ये भारताने चीनकडून ४ लाख ९२ हजार कोटींचे सामान आयात केले होते, तर भारताने १ लाख १७ कोटींचे सामान चीनला निर्यात केले होते. म्हणजे भारताला ३ लाख ७५ हजार कोटींचं नुकसान झाल होतं.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताची हाक दिली होती, त्यामुळे पुन्हा एकदा स्वदेशी वस्तू विकत घेण्याचा नारा काही संघटनांनी दिला. यानंतर चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुरु झाली.

यातच लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढल्याने या मोहिमेला गती मिळाली. चीनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या वृत्ताने चीनमध्ये खळबळ माजली, अखेर चीनी सरकारने माध्यमातून या प्रकरणावर भाष्य केले.