‘एलियन’ धडकले पृथ्वीवर? समोर आलं ऐतिहासिक संशोधन, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:53 AM2022-04-15T08:53:45+5:302022-04-15T08:57:45+5:30

२०१४ साली एका उल्कापिंडाने (एलियन ऑब्जेक्ट) पृथ्वीला धडक दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपल्यासारखेच सजीव आहेत काय, याचे मानवाला असलेले कुतुहल आजही कायम आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कित्येक मोहिमा राबवल्या गेल्या आणि आजही सुरू आहेत. मात्र, परग्रहवासीयांचा ठोस पुरावा अजून काही सापडू शकलेला नाही. सर्व काही परिचित-अपरिचिताच्या सीमारेषेवरचेच. परंतु आता २०१४ साली एका उल्कापिंडाने (एलियन ऑब्जेक्ट) पृथ्वीला धडक दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या उल्कापिंडाचा आकार एका मोठ्या शिळेसारखा होता. दीड फूट लांब असलेला हा उल्कापिंड२ लाख १० हजार किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने पृथ्वीवर आदळला.

२०१४ च्या जानेवारी महिन्यात पृथ्वीवर धडकलेला उल्कापिंड दुसऱ्या सौरमालेतून आला होता. पापुआ न्यूगिनी येथे प्रशांत महासागरात हा उल्कापिंड पडला.

यासंदर्भात हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी तपशिलात जाऊन अभ्यास केल्यानंतर ही माहिती उघड झाली. हा उल्कापिंड परग्रहावरूनच आला असावा, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या उपग्रहांची संख्या मोठी आहे. दररोज असे असंख्य प्रकार या विश्वाच्या पसाऱ्यात होत असतात. अनेकदा पृथ्वीच्या वातावरणात शिरताच ते जळून खाकही होतात.

परंतु दशकभरात एकदा तरी ‘एलियन ऑब्जेक्ट’ पृथ्वीवर आदळत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पृथ्वीचे वयोमान पाहता आतापर्यंत ४५० दशलक्ष ‘एलियन ऑब्जेक्ट्स’ पृथ्वीवर आदळले आहेत. या सगळ्याचा सखोल अभ्यास केल्यास परग्रहवासीयांची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :पृथ्वीEarth