Men Health Tips: कलौंजीची बी पुरुषांसाठी ठरते वरदान; वंध्यत्त्वासह अनेक आजारांवर ठरते गुणकारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:11 PM2022-07-20T18:11:50+5:302022-07-20T18:21:22+5:30

Men Health Tips: धावपळीचे जीवन आणि चुकीची आहारशैली याचा परिणाम पुरुषांच्या प्रकृतीवर दिसून येत आहे. केवळ उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो असे नाही, तर संपूर्ण आरोग्यावर या जीवनशैलीचे दुष्परिणाम दिसतात. त्यावर रामबाण उपाय ठरते ती म्हणजे कलौंजीची बी. तिचे सेवन कसे करायचे आणि काय लाभ मिळतात ते जाणून घेऊ.

कलौंजी अर्थात कांद्याची बी. तिची अशी ओळख तुम्हाला कदाचित पटकन होणार नाही, पण हॉटेलमध्ये नान, कुलचा किंवा तंदुरी रोटीवर काळ्या तिळासारखी दिसणारी बी, तिलाच कलौंजी म्हणतात. आता चवीसकट कलौंजी लक्षात आली असेल ना? तर तिचे सेवन फक्त हॉटेलिंगच्या वेळी नाही तर दैनंदिन जीवनातही करावा. विशेषतः पुरुषांना त्यांचे खूप लाभ होतात. कसे ते जाणून घेऊ.

कलौंजीचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात आणि अनेक प्रकारच्या आजारातही गुण येतो. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यापासून ते स्टॅमिना वाढवण्यासाठी कलौंजीचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.

कलौंजीच्या सेवनामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते. टेस्टोस्टेरॉन हार्मोनला सेक्स हार्मोन असे म्हणतात. ते क्रियाशील ठेवण्यासाठी व वंध्यत्वाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कलौंजीचे बी लाभदायक ठरते.

प्रोस्टेट ही पुरुषांमध्ये आढळणारी छोटीशी ग्रंथी असते. जी सीमेन मध्ये एक द्रव्य सोडते, त्यामुळे स्पर्मला पोषण मिळते. वाढत्या वयात किंवा पन्नाशीनंतर या ग्रंथींमध्ये नैसर्गिक वाढ होते. परंतु अकाली झालेली वाढ कर्करोगाला कारणीभूत ठरू शकते! यावर कलौंजीचे सेवन लाभदायी ठरते. यामध्ये असलेले सॅटिवा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करतो.

पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी कलौंजीची खूप मदत होते. दुधात कलोंजी मिसळून प्यायल्याने स्टॅमिना वाढतो. अशक्तपणा दूर होतो आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

केसगळतीच्या समस्येवर कलौंजीच्या बियांचा वापर केला जातो. याबाबतीत स्त्री-पुरुषांना समान लाभ होतो. यामध्ये असलेले अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म केस गळणे थांबवतात आणि केस दाट आणि मजबूत बनवण्याचे काम करतात.

सकाळी अंशपोटी एक पेला पाण्यात एक चमचा कलौंजी टाकून सेवन केल्यास त्याचे औषधीय गुण त्वरित लागू होतात. कलौंजी उष्णता वर्धक असल्याने शरीराला त्याची सवय होईपर्यंत शौचाच्या तक्रारी उद्भवू शकतात, पण ते नैसर्गिक आहे. रोजच्या पोळीला कलौंजी लावल्यास तसेच सलाड किंवा भाजीत त्याचा वापर केल्यास अतिरिक्त पद्धतीने सेवन करण्याची गरज भासत नाही. कलौंजीचे तेलही आहारात वापरता येते.