Sharad Pawar: ... तेव्हा 1 किमी चालत येऊन केलं होतं उद्घाटन, शरद पवारांना आज आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:35 PM2022-07-11T16:35:53+5:302022-07-11T16:44:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीच्या औरंगाबाद येथील आठवणी जागवल्या. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं सांगत त्यांनी इतिहास सांगितला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीच्या औरंगाबाद येथील आठवणी जागवल्या. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं सांगत त्यांनी इतिहास सांगितला.

४० वर्षांपूर्वी १९८३ साली एक किलोमीटर पायी येत या वाचनालयाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली होती. आज ४० वर्षांनी वाचनालयाचा विस्तार वाढलेला बघून आनंद वाटला.

काशिनाथ जाधव यांनी मेहनतीने रुजवलेले हे रोपटे बहरलेले बघताना आनंद वाटला. ११० पुस्तकांपासून सुरू झालेला प्रवास चाळीस वर्षांनंतर ३२ हजार पुस्तकांवर येऊन पोहोचलाय. त्या जोडीला अभ्यासिकाही उभारण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे.

सुसंस्कृत आणि सुबुद्ध समाज घडवण्यात वाचन संस्कृती आणि ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सांगताना मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण या दोन थोर नेत्यांची आठवण येते.

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण हे १४ हजार ग्रंथसंपदा ठेवून गेले होते. आज या ग्रंथसंपदेचे रूपांतर ग्रंथालयात झाले आहे. त्यांचे ग्रंथावर प्रचंड प्रेम होते. नव्या पिढ्या पुस्तक वाचून घडतात. या ग्रंथालयाद्वारे हे काम ४० वर्षांपासून होत आहे.

या कार्यक्रमात 'पाचोळा'कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा सत्कारही शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण मराठी साहित्यात बोराडे यांचे स्थान महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ते एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.

त्यांच्या 'पाचोळा' या कादंबरीच्या लिखाणाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांना सदिच्छा दिल्याचे पवार म्हणाले.

याच कार्यक्रमात अभ्युदय फाउंडेशनच्या वतीने गरजू व्यक्तींसाठी सकस व पोषक आहाराची चळवळ चालवणाऱ्या 'ताईज् किचन' या सामाजिक उपक्रमाच्या गौरी निरंतर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली, असेही पवार यांनी सांगितले.