सुकन्‍या समृद्ध‍ी, PPF वर नवीन अपडेट, एप्रिल-जून तिमाहीत किती मिळणार व्याज? सरकारनं केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 09:25 AM2024-03-29T09:25:35+5:302024-03-29T10:01:38+5:30

सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफसह अल्प बचत योजनांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनांच्या व्याजदराबाबत सरकारनं घोषणा केली आहे.

सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफसह अल्प बचत योजनांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. यापूर्वी सरकारनं अल्प बचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. आता पुन्हा एकदा १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी सरकारनं अल्प बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

याचाच अर्थ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) पूर्वीप्रमाणेच ७.१ टक्के व्याज मिळत राहील. त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना (SSY) अंतर्गत ठेवींवर ८.२ टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, तीन वर्षांच्या पोस्ट फिक्स्ड डिपॉझिटवर ७.१ टक्के व्याद मिळत राहणार आहे.

गुरुवारी अर्थ मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली. यानुसार, 'विविध अल्प बचत योजनांवरील व्याजदर २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च, २०२४) प्रमाणेच असतील.'

पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर देखील ७.१ टक्के आणि ४ टक्के कायम ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही भारत सरकारनं सुरू केलेली एक लोकप्रिय दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. त्याचा उद्देश लोकांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यात मदत करणं हा आहे. किसान विकास पत्र (KVP) वर ७.५ टक्के व्याजदर असेल. ही गुंतवणूक ११५ महिन्यांत मॅच्युअर होईल.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (NSC) वर १ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीसाठी ७.७ टक्के व्याजदर असेल. मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर चालू तिमाहीप्रमाणे ७.४ टक्के असेल. सरकार दर तिमाहीत मुख्यतः पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्प बचत योजनांसाठी व्याजदर निश्चित केले जातात.

सर्व अल्प बचत योजनांमध्ये, सुकन्या समृद्धी योजनेवर (SSY) सर्वाधिक ८.२ टक्के व्याज मिळत आहे. ही भारत सरकारची अल्प बचत योजना आहे. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानांतर्गत याची सुरुवात करण्यात आली. पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे वाचवण्यास मदत करणं हा त्याचा उद्देश आहे.