तुम्हाला माहितीये, कसा तयार झाला पोस्टाचा Pin Code? तयार करण्यामागे काय उद्देश होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:38 AM2024-04-13T08:38:32+5:302024-04-13T08:45:24+5:30

पोस्ट ऑफिस म्हटलं की, एकदम वेगळंच वातावरण मनात तयार होतं. आठवणींच्या हिंदोळ्यावरून व्यक्ती भूतकाळात रममाण होतं. पण तुम्हाला माहितीये तुम्ही पत्र पाठवत असलेल्या पिन कोडचा जन्म कसा झाला?

India Post Office म्हटलं की, एकदम वेगळंच वातावरण मनात तयार होतं. आठवणींच्या हिंदोळ्यावरून व्यक्ती भूतकाळात रममाण होते. जुन्या काळी पत्र, तार याच माध्यमातून आप्तेष्टांची चौकशी, ख्याली-खुशाली समजत असे.

पिन कोडची निर्मिती हा भारतीय टपाल विभागाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. टपाल कार्यालयात एकाच नावाची गावं आणि शहरांची पत्रं येऊ लागली तेव्हा पिन कोडची गरज भासू लागली. मग संपूर्ण देशाची वेगवेगळ्या भागात विभागणी करून पिन कोड तयार करण्याची गरज भासली. पिन कोड बनवण्यामागचा उद्देश काय आहे आणि त्याचे नंबर काय सांगतात हे आज जाणून घेऊ.

पिन कोड हे पोस्टल इंडेक्स (Postal Index Number) नंबरचं छोटं नाव आहे. जेव्हा आपण देशात कुठेही पत्र पाठवतो तेव्हा सहसा कोणत्याही पत्त्याच्या शेवटी याचा उल्लेख केला जातो. पिन हा भारतीय टपाल प्रणालीतील सहा अंकी संख्यात्मक कोड आहे.

भारतासारख्या मोठ्या देशात, इतकी गावं, शहरं आहेत की भारतीय पोस्टल सेवांसाठी योग्य व्यक्ती किंवा ठिकाण शोधणे थोडं आव्हानात्मक असू शकतं. अशा प्रकारे, पार्सल किंवा पत्र वितरित करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी, भारतीय पोस्टानं सहा अंकी पिन कोड क्रमांक तयार केलाय.

स्वातंत्र्यापूर्वी भारतात पिन कोड अस्तित्वात नव्हता. स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके पिन कोड तयार झाला नव्हता. वास्तविक, दळणवळण मंत्रालयाचे तत्कालीन अतिरिक्त सचिव श्रीराम भिकाजी यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोडची सुरुवात केली. पोस्ट ऑफिसमध्ये येणारी पत्रांचं मॅन्युअली वर्गीकरण आणि वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पिन कोडची नवीन प्रणाली महत्त्वपूर्ण मानली गेली.

कारण वेगवेगळ्या भाषा आणि तत्सम नावं, शिवाय पत्त्यांमुळे टपाल कर्मचाऱ्यांचा बराच गोंधळ उडाला. यावर मात करण्यासाठी, एका मानक प्रक्रियेची गरज भासू लागली जी प्रक्रिया सुलभ करण्यात मदत करणार होती. अशा प्रकारे, राज्ये, जिल्हे आणि शहरे ओळखण्यासाठी पिन कोड तयार करण्यात आले.

भारतीय पोस्टल सेवेमध्ये, संपूर्ण भारत नऊ विशेष पिन क्षेत्रांमध्ये विभागलेला आहे. यापैकी आठ भौगोलिक क्षेत्रे आहेत आणि नववे क्षेत्र भारतीय लष्करासाठी राखीव आहे. पिन कोडचा पहिला अंक क्षेत्र दर्शवतो, दुसरा अंक सबझोन आहे, तिसरा अंक त्या क्षेत्रातील वर्गीकरण जिल्हा दर्शवतो आणि शेवटचे तीन अंक त्या जिल्ह्यातील विशिष्ट पोस्ट ऑफिस दर्शवतात.

संपूर्ण देशात १.५ लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस आहेत. परंतु ही पोस्ट ऑफिस १९,१०१ पिन कोडमध्ये विभागली गेली आहेत. ही पोस्ट ऑफिसेस पाच पोस्ट ऑफिस झोनमध्ये विभागली गेली आहेत. हे उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि आर्मी पोस्टल झोन आहेत. उत्तर विभागाचा कोड १ आणि २ आहे, पश्चिम विभागाचा कोड ३ आणि ४ आहे, दक्षिण विभागाचा कोड ५ आणि ६ आहे आणि पूर्व विभागाचा कोड ७ आणि ८ आहे.

प्रत्येक पिन एका डिलिव्हरी पोस्ट ऑफिससाठी डिझाइन केला आहे ज्याला त्याच्या अधिकारक्षेत्रातील वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसमध्ये वितरित केले जाणारे सर्व मेल प्राप्त होतील. डिलिव्हरी पोस्ट ऑफिस हे सामान्य पोस्ट ऑफिस, सब पोस्ट ऑफिस किंवा शहरी भागातील मुख्य पोस्ट ऑफिस असू शकते. या पोस्ट ऑफिसमधून पत्रे गोळा केली जातात आणि संबंधित सब पोस्ट ऑफिसमध्ये दिली जातात. त्यानंतर पोस्टमनच्या मदतीने ती आपल्या घरी पोहोचवली जातात.

सहसा, पिन कोड पोस्ट ऑफिसच्या बाहेरील कोणत्याही लेटर बॉक्सच्या वर लिहिलेला असतो. तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा जवळच्या लेटर बॉक्सवर जाऊन तुमच्या क्षेत्राचा पिन कोड जाणून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पुस्तकातही शोधू शकता. यासाठी भारतीय टपाल विभागाने पिन कोड बुक छापलं आहे. याशिवाय https://www.indiapost.gov.in/ वर जाऊन तुम्ही तुमचा पिन कोड मिळवू शकता. यावर तुम्हाला सर्व माहिती टाकावी लागेल आणि शेवटी सबमिट वर क्लिक करावं लागेल.