Relationship Tips: रोजची भांडणं, कटकटी, वादविवादाला कंटाळलात? 'या' टिप्स नात्यात आणतील गोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 02:43 PM2024-04-04T14:43:22+5:302024-04-04T14:47:18+5:30

Relationship Tips: नात्याचे कोडे सोडवणे हे प्रत्येकासाठी आव्हान असते. अनेक वेळा प्रयत्न करूनही नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदार एकमेकांबद्दल तक्रारी करू लागतात. मात्र वादविवादाचे विषय वेळीच हाताळले नाहीत, तर त्यातून निर्माण होणारे गैरसमज नाते तोडण्यास कारणीभूत ठरू शकतात. यावर कायमस्वरूपी मार्ग शोधत असाल तर पुढील टिप्स नक्की वापरून पहा!

जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा घटनेबद्दल एखाद्याला गृहीत धरतो आणि मनाने निष्कर्ष काढतो तेव्हा नात्यामध्ये गोंधळ सुरू होतो. कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काही कळले तर तुमच्या मनाने निष्कर्ष काढू नका. तुमच्या जोडीदाराशी याबद्दल नेहमी स्वच्छ मनाने बोला. बोलत असताना समोरच्याचे पूर्ण ऐका. तुमचे मत लादू नका. मोकळेपणाने बोलल्याने अनेक गैरसमज दूर होतात आणि नाते घट्ट होते.

आजच्या व्यग्र जीवनात सर्वात मौल्यवान काय आहे तर – वेळ. वेळेबरोबर नात्याची किंमतही समजून घेतली पाहिजे. मौल्यवान नाते टिकवून ठेवण्यासाठी नेहमी एकमेकांसोबत चांगला वेळ एकत्र घालवला पाहिजे. एकमेकांचे ऐकून घेतले पाहिजे, जर जोडीदार कामामुळे वेळ देऊ शकत नसेल तर त्यालाही थोडा वेळ द्या आणि जेव्हा एकत्र वेळ मिळेल तेव्हा वादाचे विषय न काढता एकमेकांबरोबर छान गप्पा मारा.

हे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल, की 'राग त्याच्यावरच येतो, ज्याच्यावर आपण प्रेम करतो. तथापि, आपण हा संवाद जीवनाचा भाग बनविणे टाळले पाहिजे. खरं तर, रागामुळेच नाती बिघडतात. कोणत्याही गोष्टीवर रागाने प्रतिक्रिया देऊ नका. जरी तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटत नसेल, तरीही तुमचा आक्षेप सभ्यपणे व्यक्त करा. यामुळे परस्पर आदराची भावना वाढते आणि नाते दृढ होते.

कोणतेही नाते हे विश्वासावर आधारित असते. विश्वास हा नातेसंबंधांचा पाया असतो. बहुतेक नातेसंबंध तुटण्यात अविश्वास आणि शंका मोठी भूमिका बजावते. एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर त्यावर मनमोकळेपणाने चर्चा करून शंका दूर करा. तुमच्या शंकेमुळे अविश्वास होऊ देऊ नका. त्याचप्रमाणे, तुमच्या जोडीदाराच्या मनात अशी कोणतीही शंका किंवा अविश्वास निर्माण होईल असे कृत्य करणे टाळा.

अनेकदा काही चूक झाली की जोडीदाराची अडवणूक करायला आपण मागेपुढे पाहत नाही, पण जेव्हा कौतुकाचा विषय येतो तेव्हा आपण हात राखून बोलतो. कौतुक जसे आपल्याला आवडते तसे जोडीदारालाही आवडते हे कायम लक्षात ठेवा. ते होऊ नये म्हणून तुमच्या जोडीदाराची नेहमी मोकळेपणाने स्तुती करा. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आदर तर वाढतोच, पण नातंही घट्ट होतं. जरी तुम्हाला एखादी गोष्ट लहान वाटत असली तरी तुमच्या जोडीदाराने त्यासाठी प्रयत्न केले असतील तर त्याची प्रशंसा करा. नात्यात छोट्या मोठ्या कुरबुरी होतच राहतात, पण ती वेळच्या वेळी मिटवण्याची कला आपणच आत्मसात करून घ्यायला हवी. तरच नात्यात गोडवा टिकतो आणि वाढतो!