Renault Kiger Review: रेनॉ कायगर अन् १८०० किमींचा प्रवास, गावखेडी, कोकणातले नागमोडी घाट, रस्ते.... कशी वाटली?

By हेमंत बावकर | Published: May 16, 2023 04:07 PM2023-05-16T16:07:15+5:302023-05-16T16:16:34+5:30

सीव्हीटी होती म्हणून सुटलो... मोठमोठाले घाट, त्यांचा चढ उतार, मुंबई-पुण्याचे ट्रॅफिक, गावाकडे निघालेली वाहनांची ही गर्दी, नागमोडी रस्ते आदी १० दिवसांचा प्रवास...

डिझेलच्या कार केंद्र सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच जर शिफारसीवर निर्णय झालाच तर त्यानंतर नवी डिझेलची कार बाजारात येणार नाही. यामुळे पेट्रोल, सीएनजी आणि ईलेक्ट्रीक गाड्याच असणार आहेत. भारतीय बाजारात स्वदेशी कंपन्यांसोबतच परदेशात प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांच्या कारही आहेत. यापैकीच एक छोट्याकारद्वारे बऱ्यापैकी पाय पसरलेली कंपनी रेनॉ इंडिया आहे. आम्ही रेनॉची कायगर ही एसयुव्ही जवळपास १८०० किमी चालविली. मोठमोठाले घाट, त्यांचा चढ उतार, मुंबई-पुण्याचे ट्रॅफिक, गावाकडचे नागमोडी रस्ते आदी ठिकाणी ही कार चालविली. आम्हाला कशी वाटली.

रेनॉच्या तीन कार सध्या भारतात उपलब्ध आहेत. कमी किंमतीत मस्क्युलर लुक असलेल्या कार आणण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. छोटी क्विड, सात सीटर ट्रायबर आणि कॉम्पॅक्ट एसयुव्ही कायगर. आम्हाला कायगरचे टर्बो सीव्हीटी मॉडेल मिळाले होते. मस्क्युलर लुकसोबतच केबिन प्रशस्त आणि चांगली डिझाईन केलेली होती. पाण्याच्या बाटल्या ठेवण्याची स्पेस, डॅशबोर्डमध्ये दोन कप्पे, गिअर कंसोलवर आर्मरेस्ट आणि त्यात पुन्हा छोट्या पाण्याच्या बाटल्या व अन्य कार्ड, कागदपत्रे ठेवण्यासाठी चांगली जागा दिली होती.

टचस्क्रीन योग्य प्रकारे काम करत होती. अँड्रॉईड ऑटोला ब्ल्युटूथ कनेक्टिव्हीव्ही होती. म्युमिझक सिस्टिमचा आवाजही चांगला होता. मागच्या सीटवरही आर्मरेस्ट देण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी कारची हेडलाईटचा थ्रो एलईडी असला तरी चांगल्याप्रकारे रस्ता कव्हर करत होता. आतमध्येही दोन लाईट देण्यात आले होते. बुटस्पेसमध्येही लाईट देण्यात आले होते. स्टिअरिंगवर म्युझिकच्या कंट्रोलसह एक महत्वाचे फिचर क्रूझ कंट्रोलची बटने देण्यात आली होती. बुटस्पेसमध्ये पाच जणांचे साहित्य, बॅगा आरामात बसल्या होत्या.

रेनॉ कायगरमध्ये ९९९ सीसी इंजिन देण्यात आले आहे. सीव्हीटी असल्याने आम्हाला ओव्हरटेक करताना थोडी पिकअपला मार खाण्याची व गिअर बदलल्याने वेग कमी करण्याची भीती वाटली होती. परंतू, खंडाळ्याचा घाट असो की, बावडा घाट की एक्स्प्रेस हायवे कुठेही गाडीने पिकअपला मार खाल्ला नाही. महत्वाचे म्हणजे कार गिअर बदलायची त्याचे झटके देखील जाणवले नाहीत.

क्रूझ कंट्रोल तर चांगल्याप्रकारे काम करत होता. एक्प्रेस हायवेवर १०० ची वेगमर्यादा ओलांडू नये म्हणून, पुढे पुणे बंगळुर मार्गावर ८० ची वेगमर्यादा ओलांडू नये म्हणून एकच वेग निर्धारित करणे यामुळे सोपे गेले. सुट्ट्यांचे दिवस सुरु होते, यामुळे खंडाळा घाटात तुफान गर्दी होती. त्यातही गाडी एक इंचही मागे गेली नाही. तीव्र चढण असली तरी अॅक्सिलेटरवर पाय ठेवल्याठेवल्या पुढे जात होती.

कारमध्ये तुमच्या आवडीनुसार परफॉर्मन्स देण्यासाठी इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन मोड देण्यात आले आहेत. पैकी इको मोडवर कार एकदम मरगळल्यासारखी वाटली. अॅक्सिलेटरवर पाय देऊनही गाडी गरजेप्रमाणे पिकअप घेत नव्हती. परंतू नॉर्मल मोड करताना काही क्षणांत ताकद यायची. स्पोर्टला त्यापेक्षा जास्त ताकद मिळायची. यामुळे जर इको मोडवरून नॉर्मलला स्विच व्हायचे असेल तर अचानक पिकअप घेईल म्हणून अॅक्सिलेटरवरचा पाय सांभाळून ठेवावा लागत होता. परंतू, बहुतांश आम्ही नॉर्मल मोडवरच कार चालविली.

एसीचे व्हेंट्स मागच्या पॅसेंजरनाही दिलेले असल्याने उकाड्याच्या दिवसात केबिन थंड राहत होती. संपूर्ण प्रवासात पाच सीट आणि एसी असला तरी गाडी पिकअपला मागे हटत नव्हती. रस्त्यावरील खड्डे आतमध्ये जाणवत नसले तरी चाकांचा आवाज आतमध्ये बऱ्यापैकी येत होता. गगनबावडा घाटातदेखील कार वळणावर बॅलन्स वाटली. कुठेही तोल गेल्यासारखे वाटले नाही.

गावातील रस्त्यांवरही कारने चांगले परफॉर्म केले. नागमोडी वळणे, एकावेळी एकच गाडी सुटेल असे कोकणातील रस्त्यांवर या कारने उत्तम ब्रेकिंगचे देखील काम केले. अचानक समोरून वाहन आले तर ब्रेकिंग यंत्रणा महत्वाची असते, त्याचबरोबर कारचा बॅलन्स यात ही कार उजवी ठरली. इंजिनचा आवाज केबिनमध्ये जवळपास शून्य एवढा होता. केवळ स्टार्ट करताना थोडा आवाज यायचा.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रेनॉची कायगर कार ही सीव्हीटी होती. यामुळे संमिश्र मायलेज आम्हाला १४.२ किमी प्रति लीटरचे मिळाले. एक्स्प्रेस हायवेवर २०.५ तर पुणे-बंगळुरु हायवेवर १५-१६ च्या दरम्यान मिळाले. ट्रॅफिकमध्ये ८-९ आणि हलक्या ट्रॅफिकमध्ये १२.३ किमी प्रति लीटर एवढे मायलेज मिळाले. साधारण या रेंजच्या इतर कार याचे रेंजमध्ये मायलेज देतात. यामुळे जास्त मायलेज हवे असेल तर सीव्हीटी पेक्षा मॅन्युअल गिअरची कारचा पर्याय आहे. हे मायलेज तेव्हाची वाहतूक परिस्थिती, वाहनांचा वेग, गाडीतील लोड आणि तुमची चालविण्याची पद्धत यावर अवलंबून असते.

ट्रॅफिक असो की घाट कारने चांगला पिकअप दिला. फिचर्सचा विचार केला तर यात क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, वायरलेस मोबाईल चार्जिंग आणि बाहेर तसेच आतमध्ये एसयुव्हीचा फिल देणारे डिझाईन आहे. चार ते पाच जणांच्या फॅमिलीसाठी, लाँग ट्रिपसाठी चांगला पर्याय ठरू शकते.

मायलेजची चिंता असेल तर तुम्ही मॅन्युअलकडे जाऊ शकता तिथे तुम्हाला ३-४ किमी अधिकचे मायलेज मिळू शकते. रेनो किगर साडे सहा -सात लाखांपासून सुरु होते. यामुळे सामान्यांच्या बजेटमध्ये देखील ही कार येऊ शकते. फक्त काही फिचर्स कमी होऊ शकतात. परंतू, ज्यांना निवांत, गिअर बदलण्याची कटकट नको असेल, महिलांसाठी ही सीव्हीटी कार चांगला पर्याय ठरू शकते.