Tyre Burst Accident: भर वेगात टायर फुटण्यापासून स्वत:ला कसे वाचवाल? नंतर वेळ निघून गेलेली असते...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:51 AM2023-04-13T10:51:53+5:302023-04-13T10:57:18+5:30

तुमचा नेहमीचा टायरवाला असेल आणि जर तुम्ही त्याला टायरबाबत विचारले तर तो तुम्हाला 'लंबा चलेगा' म्हणूनच सांगेल. परंतू, तसे नसते. तुमची काळजी तुम्हालाच घ्यायची असते.

उन्हाळ्यातील तापमान वाढू लागताच गाड्यांचे टायर फुटण्याचे प्रकारही वाढतात. यामुळे अनेकांचे जीव जातात, अनेकांना जायबंदी व्हावे लागते. तुम्ही तुमच्या वाहनाच्या टायरची काळजी घेतली नाही तर हा प्रकार कधी ना कधी होतोच. एक्स्प्रेस हायवे, सिमेंटचे रस्ते असतील तर टायर फुटण्याच्या घटना होत असतात. यामुळे टायरची काळजी कशी घ्यावी, याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

तुमचा नेहमीचा टायरवाला असेल आणि जर तुम्ही त्याला टायरबाबत विचारले तर तो तुम्हाला 'लंबा चलेगा' म्हणूनच सांगेल. परंतू, तसे नसते. तुमची काळजी तुम्हालाच घ्यायची असते.

गाडी चालविताना अचानक स्फोटाचा आवाज येतो. टायर फुटल्याने गाडी बॅलन्स गमावते. एक चाक वर उचलून खाली गेल्याने गाडी एकाबाजुला फेकली जाते. ती जर कंट्रोल करता आली नाही तर अपघात होतो. यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

टायर हा रबर, कार्बन, तारा, दोरे यांपासून बनलेला असतो. यामुळे त्याचेही एक आयुष्य असते. उन्हात, पावसात, थंडीत आणि दगड किंवा खड्डेमय रस्त्यांवरून जाताना टायरवरही परिणाम होत असतो. यामुळे उन्हाळात टायर फुटण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. यामुळे थोडा खिशावर ताण आला तरी चालेल तुमच्या कारचे टायर वेळच्यावेळी बदला.

टायरमध्ये अनेकजण साधी हवा भरतात. कुठेही भरत असल्याने हवा भरण्याचे पंप मेन्टेन केलेले नसतात. यामुळे त्यांच्याकडून जास्तीची हवा भरली जाऊ शकते. तसेच तुम्ही तुमच्या गाडीतील वजनानुसार हवा भरावी. जमल्यास नायट्रोजन भरावा, टायर रस्त्यावर चालत असताना घर्षणातून उष्णता निर्माण होते. त्यामुळे आतील हवा तापते आणि वाढते. यामुळे टायरचा स्फोट होते. त्या तुलनेत नायट्रोजन कमी तापतो.

अनेकदा वेगाने वाहन चालविणे देखील टायर बर्स्ट होण्याचे कारण असते. यामुळे नेहमी कार चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या टायरची कंडीशन पाहून आणि रस्त्यावरील वेगमर्यादा पाहून तुम्ही कार किंवा बाईक चालवा. कमी वेगात असताना टायर फुटला तर वाहन नियंत्रित करता येते. अन्यथा आपल्या हाती काहीच उरत नाही.

काही काही दिवसांनी तुमच्या वाहनाचे सर्व टायर तपासत रहा. बल्ज आला असेल, कुठे कट गेला असेल, टायरची ग्रिप जास्त घासली जात असेल तर त्यावर काम करणे गरजेचे आहे. कारचे व्हील अलायमेंट वेळचे वेळी करावे. म्हणजे टायरचे आयुष्य वाढते. मायलेजही जास्त मिळते व तुम्ही देखील सुरक्षित राहता.