Electric Scooter: नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 50 हजारांपेक्षाही कमी; रेंज इतकी की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 02:00 PM2022-09-30T14:00:07+5:302022-09-30T14:03:41+5:30

Electric Scooter: जीटी फोर्सने दोन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. पाहा किंमत आणि फीचर्स...

Electric Scooter Launch: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या आपल्या विविध इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक्स लॉन्च करत आहेत. यातच आता इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी जीटी फोर्सने आपली जीटी सोल वेगास (GT Soul Vegas) आणि जीटी ड्राइव्ह प्रो (GT Drive Pro) नावाच्या दोन नवीन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत.

कंपनीने या गाड्यांची किंमत अनुक्रमे 47,370 रुपये आणि 67,208 रुपये ठेवली आहे. स्कूटर्समध्ये लेड-अॅसिड बॅटरी आणि लिथियम-आयन बॅटरी पैकचा पर्याय देण्यात आला आहे. मार्केटमध्ये या गाड्यांची स्पर्धा Avon E Scoot (किंमत 45,000 रुपये), Bounce Infinity E1 (किंमत 45,099 रुपये), Hero Electric Optima CX सिंगल बॅटरी (किंमत 62,190 रुपये) आणि Okinawa R30 (किंमत 61,420 रुपये) या गाड्यांसोबत असेल.

जीटी फोर्सने या दोन्ही स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी(शहरांतर्गत प्रवास) तयार केल्या आहेत. जीटी सोल वेगासचे 60V 28Ah लेड-अॅसिड बॅटरी व्हेरिएंट 60 किमीची रेंज देईल तर, 60V 26Ah लिथियम-आयन बॅटरी असलेले व्हेरिएंट 65 किमीची रेंज देईल. कंपनीच्या दाव्यानुसार, लेड-अॅसिड बॅटरीला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सूमारे 8 तास आणि लिथियम-आयन बॅटरी पॅकला चार्ज होण्यासाठी सूमारे 5 तास लागतील.

जीटी सोल वेगासचे वजन 95 किलोग्राम (लेड-एसिड बॅटरी) आणि 88 किलोग्राम (लिथियम-आयन बॅटरी) आहे. तसेच, वजन या गाडीची वजन पेलण्याची क्षमता 150 किलो असून, ग्राउंड क्लीयरेंस 170 मिमी आहे. या स्कूरमध्ये कंपनीने अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल सिस्टीम, इग्निशन लॉक स्टार्ट, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि ड्युअल ट्यूब रिअर सस्पेंशन दिले आहे. ही गाडी- ग्लॉसी रेड, ग्रे आणि ऑरेंज, या तीन कलरमध्ये मिळेल.

जीटी ड्राइव्ह प्रोमध्ये 48V 28Ah लेड-अॅसिड बॅटरी आणि 48V 26Ah लिथियम-आयन बॅटरी पॅकचा पर्याय मिळेल. या गीडीची रेंज, बॅटरी चार्ज करण्याची वेळ आणि इतर फीचर्स जीटी सोल वेगाससारखेच आहेत. परंतू, या गाडीचे वजन 85 किलोग्राम आणि वजन पेलण्याची क्षमता 140 किलोग्राम आहे. जीटी ड्राइव्ह प्रो व्हाइट, ब्लू, रेड आणि चॉकलेट कलरमध्ये उपलब्ध आहे.