परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसैनिकांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:33 PM2018-06-15T14:33:45+5:302018-06-15T14:33:45+5:30

शेतकऱ्यांच्या बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले.

Jail Bharo movement of Shiv Sainiks on farmers' issue in Parbhani district | परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसैनिकांचे जेलभरो आंदोलन

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसैनिकांचे जेलभरो आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देरस्ता अडवून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक करुन काही वेळाने सोडून दिले.

परभणी- शेतकऱ्यांच्या बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. रस्ता अडवून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक करुन काही वेळाने सोडून दिले.

जिल्ह्यात शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही या कष्टकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने खा.बंडू जाधव यांनी शासन, प्रशासनाच्या धोरणाविरोधात जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानुसार १५ जून रोजी सकाळपासूनच जिल्ह्यात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी रस्ता अडवून आंदोलने केली. परभणी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नानवर परभणी-जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी पाटीवर आंदोलन करण्यात आले. खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी रस्ता अडवून घोषणाबाजी केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरु झालेले आंदोलन अर्धातास चालले. मुख्य रस्ता अडविल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, युवासेनेचे अर्जून सामाले, विधानसभा प्रमुख माणिक पोंढे, संदीप भंडारी, दिलीप आवचार, गजानन देशमुख, माणिक भालेराव, बालासाहेब कदम, नामदेव कदम, अर्जून रणेर, बन्सी भालेराव, भास्कर देवडे, गितेश देशमुख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी १०० ते १५० शिवसैनिकांना अटक करुन नंतर त्यांची सुटका केली.

परभणीसह गंगाखेड, जिंतूर, बोरी, मानवत या ठिकाणीही आंदोलन करण्यात आले. मानवत येथे दुपारी १२ वाजता जि.प.सदस्य विष्णू मांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात पं.स.सभापती बंडू मुळे, राजू कच्छवे, संतोष जाधव, बाजार समितीचे संचालक माणिक काळे, नगरसेवक दत्ता चौधरी, शिवाजी उक्कलकर, शिवाजी हिंगे, रामप्रसाद निर्मळ, पिंटू निर्वळ, अनिल कदम यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक मीना कर्डक, सहाय्यक निरीक्षक प्रवीण दिनकर, उपनिरीक्षक शिवाशंकर मन्नाळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

ताडकळसमध्ये रास्तारोको
ताडकळस येथे तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनात उद्धवराव काळे, दिलीपराव पाटील, मदन अंभुरे, माणिक पुंजारे, प्रकाश फुलवरे, राम व्यंकटराव, गणेश गाढवे, गोपाळ अंभुरे, बालाजी रुद्रवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बोरीत वाघीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पीक विम्याचा मोबदला द्यावा, रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी प्रभाकर वाघीकर यांच्या नेतृत्वाखाली कौसडी फाटा येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. सुमारे ५०० आंदोलनकर्त्यांवर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनात तालुकाप्रमुख भारत पवार, संदीप अंभुरे, हनुमान बोबडे, वैजनाथ कदम, रवि देशमुख, भारत जीवणे, अकबर पठाण, प्रकाश चौधरी, कुंदन देशमुख, सुभाषराव देशमुख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहाय्यक निरीक्षक व्यंकटेश आलेवार, उपनिरीक्षक सुनील अवसरमोल यांनी बंदोबस्त ठेवला होता.

गंगाखेडमध्ये जेलभरो
गंगाखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको करुन जेलभरो करण्यात आला. उपजिल्हाप्रमुख पंढरीनाथ धोंडगे, तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या मागण्यांसाठी आंदोलन
पीक विम्याचा मोबदला सर्व शेतकऱ्यांना द्यावा, रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, हरभरा व तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Jail Bharo movement of Shiv Sainiks on farmers' issue in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.