नागपूर जिल्ह्यात स्कूल बसने घेतला विद्यार्थ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:53 AM2018-07-14T00:53:16+5:302018-07-14T00:54:09+5:30

स्कूल बसमधून उतरत असतानाच बसचालकाने बस पुढे नेली. त्यामुळे तोल गेला आणि त्यातच बसच्या मागील चाकात येऊन नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयदावक घटना उमरेड तालुक्यातील अकोला येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांनी संतप्त होऊन स्कूल बसची तोडफोड केली. या घटनेने नागपुरातील वीरथ झाडे मृत्यूप्रकरणाच्या स्मृती ताज्या झाल्या.

School bus took a life of student in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात स्कूल बसने घेतला विद्यार्थ्याचा बळी

नागपूर जिल्ह्यात स्कूल बसने घेतला विद्यार्थ्याचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देउमरेड तालुक्यातील अकोला येथील घटना : संतप्त ग्रामस्थांनी फोडली स्कूलबस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्कूल बसमधून उतरत असतानाच बसचालकाने बस पुढे नेली. त्यामुळे तोल गेला आणि त्यातच बसच्या मागील चाकात येऊन नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयदावक घटना उमरेड तालुक्यातील अकोला येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांनी संतप्त होऊन स्कूल बसची तोडफोड केली. या घटनेने नागपुरातील वीरथ झाडे मृत्यूप्रकरणाच्या स्मृती ताज्या झाल्या.
शिवम प्रभाकर राघोर्ते (३, रा. अकोला, ता. उमरेड) असे मृत चिमुकल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शिवम हा आपतूर येथील वृंदावन कॉन्व्हेंटचा नर्सरीचा विद्यार्थी होता. कॉन्व्हेंटसोबतच कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण याठिकाणी उपलब्ध आहे. सदर कॉन्व्हेंटची पटसंख्या ४३ असून यापैकी साधारणत: २५ विद्यार्थी हे सभोवतालच्या गावातील आहेत. सकाळी ९.३० ते दुपारी २.३० अशी कॉन्व्हेंटची वेळ आहे. शुक्रवारी दुपारी २.३० वाजता कॉन्व्हेंटला सुटी होताच ही एमएच-४०/वाय-११३६ क्रमांकाची बस विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी निघाली. या बसवर परमेश्वर गोविंदा देशमुख (३५, रा. आपतूर) हा बसचालक होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही बस अकोला येथे पोहचली. या गावातील अयम घोनमोडे आणि शिवम रार्घोते दोन्ही विद्यार्थी या बसमध्ये होते. अयम आधी उतरला. त्यानंतर शिवम बसमधून खाली येणार तोच बसचालक परमेश्वरने बस पुढे रेटली. त्यामुळे शिवमचा तोल गेला आणि तो मागील चाकात फसला. यात तो जागीच ठार झाला.
गावात अपघाताची बाब समोर येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी चालक परमेश्वर याने बस जागीच उभी करीत घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी स्कूल बस फोडली. उमरेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी २७९, ३०४ अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश हाके करीत आहेत.
उमरेड पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली बसही पोलीस ठाण्यात जमा केली. सदर बसवर वृंदावन कॉन्व्हेंट व ज्युनिअर कॉलेज आपतूर असे नमूद आहे. वृंदावन कॉन्व्हेंट हे आपतूर येथे सुमारे पाच ते सहा वर्षापासून सुरू असल्याची माहिती आहे. राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर व्दारा संचालित या संस्थेंतर्गत सदर शाळा आणि महाविद्यालयाचा कारभार चालतो.

अवघी पाच दिवसाची शाळा!
अकोला येथे स्कूल बसने बळी घेतलेल्या शिवम राघोर्ते या चिमुकल्याची शाळा अवघी पाचच दिवसांची ठरली. पहिल्या दिवशी रडतच कसाबसा शाळेत जाणारा शिवम हा शाळा समजूही शकला नव्हता. शाळा कशी, शिक्षक कसे, एबीसीडीचे धडे आणि पोएमही त्याला माहिती नव्हत्या. आता कुठे त्याची चिमुकल्या दोस्तांसोबत दोस्ती होणार होती. स्कूल मस्तीही सुरू झाली असती... अशातच धक्कादायक आणि थरकाप उडविणारे इपरीत घडले. केवळ तीन वर्षाच्या शिवमला स्कूल बसच्या मागील चाकात रक्तबंबाळ अवस्थेत पाहून सारेच हेलावले.
उमरेड तालुक्यातील आपतूर येथे वृंदावन कॉन्व्हेंट आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाच दिवसाच्या सवयीप्रमाणे स्कूलबसच्या प्रतीक्षेत शिवमचे आजोबा दिवाकर राघोर्ते रस्त्याच्या कडेलाच उभे होते. आपला नातू येणार म्हणून त्यांच्या नजरा वारंवार रस्त्याकडे खिळून होत्या. बस आली. आजोबा आपल्या नातवाला कडेवर घेण्यासाठी पुढे सरसावले. त्याआधीच शिवम हा स्कूलबसच्या चाकात सापडला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्याला पाहून आजोबा दिवाकर यांच्यावर आभाळच कोसळले.
दुसरीकडे आई सविता, वडील प्रभाकर आणि आजी शेतावर होते. आपला शिवम शाळेतून घरी परत येणार अशा विचारात असतानाच शिवमचा अपघात झाल्याची बातमी शेतावर पोहचली. मायमाऊलीसह सारेच सैरावैरा पळत सुटले. रक्तबंबाळ अवस्थेत शिवमला बघताच साºयांनीच हंबरडा फोडला. गोळा झालेल्या गावकºयांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

दोन दिवसांपूर्वीच झाला तिसरा वाढदिवस
प्रभाकर राघोर्तेे हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. शिवम हा त्यांचा एकुलता एक मुलगा. पोटाला पीळ देत त्यांनी यंदा शिवमला नर्सरीमध्ये पाठविले. शिवमचा जन्मदिवस ११ जुलैचा. दोनच दिवसांपूर्वी शुभमचा तिसरा वाढदिवस आनंदात साजरा झाला. शिवम एकुलता एकच! यामुळे पाचवा वाढदिवस धुमधडाक्यात करण्याचे स्वप्नही रार्घोते कुटुंबीयांनी रंगविले होते. अशातच केवळ दोन दिवस उलटत नाही तोच शिवमच्या अशा जाण्याने सारेच हादरून गेले आहेत.

तो थोडक्यात बचावला
स्कूलबसमध्ये अकोला गावातील शिवम आणि त्याच्याच वयाचा अयम घोनमोडे सोबत होता. बस गावात पोहचताच आधी अयम उतरला. त्यापाठोपाठ शिवमने पुढाकार घेतला. अशातच वाहनचालक परमेश्वर देशमुख याने स्कूल बस पुढे नेली. यात शिवम जागीच ठार झाला. अयम हा थोडक्यात या अपघातात बचावला अन्यथा त्याचाही हकनाक बळी गेला असता.

वाहकच नाही
स्कूलबसमध्ये चालक म्हणून परमेश्वर देशमुख हा होता. त्याच्या सोबतीला वाहक म्हणून कुणीही नव्हते. त्यामुळे बसमधून विद्यार्थी चढविताना आणि उतरविताना कोणतीही काळजी घेतली जात नव्हती. वाहकाचा पगार वाचविण्यासाठी शाळा संचालकांनी ही युक्ती केल्याचे बोलले जाते. प्रारंभापासून या स्कूलबसमध्ये वाहकच नसल्याचेही समजते. अधिकाधिक मलई कमविण्याच्या या गोरखधंद्यातून घडलेला हा प्रकार संतापजनकच ठरत आहे. शाळा संचालकांवरही कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
बारा गावचा प्रवास
सदर शाळेच्या स्कूलबसमध्ये साधारणत: २५ विद्यार्थी प्रवास करतात. विद्यार्थ्यांना आपतूर येथून सभोवतालच्या सुमारे १२ गावातील विद्यार्थ्यांना ने - आण करण्यासाठी या स्कूलबसचा वापर केला जातो. पारडी, चाळा, मालसी, बाम्हणी, कोटगाव, गावसूत, अकोला, निरवा, पिपळा, बारव्हा असा संपूर्ण फेरा या स्कूलबसचा आहे. अकोला येथे अपघात झाल्यानंतर बसमध्ये पिपळा, बारव्हा आणि निरव्हा येथील आठ ते दहा विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना बसमध्येच सोडून आरोपी बसचालकाने पळ काढल्याने गावकरी अधिक संतापले आहेत.

Web Title: School bus took a life of student in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.