कन्नड घाटात भीषण अपघातात, मालेगावचे चार जण ठार, ७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:00 AM2023-11-27T10:00:46+5:302023-11-27T10:01:14+5:30

अक्कलकोट येथून परतणा-या भाविकांवर काळाची झडप

Four people from Malegaon killed, 7 injured in horrific accident at Kannada Ghat | कन्नड घाटात भीषण अपघातात, मालेगावचे चार जण ठार, ७ जखमी

कन्नड घाटात भीषण अपघातात, मालेगावचे चार जण ठार, ७ जखमी

- जिजाबराव वाघ

चाळीसगाव (जि.जळगाव) : कन्नड घाटात रविवारी रात्री १२ वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करुन परतणा-या जानेवाडी ता. मालेगाव येथील भाविकांच्या खासगी वाहनाला गंभीर अपघात झाला. वाहन हे खोल दरीत कोसळल्याने चार जण ठार तर ७ जखमी झाले आहेत.

 अपघातातून बचावलेल्या मुलाने प्रसंगावधान राखत घटनेची माहिती दिल्यानेच रात्री १  वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीमसह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलिसांसोबतच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाग्रास्तांना खोल दरीतून वर काढले. रात्री घाटात प्रचंड धुके होते. पाऊसही असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार पथके तयार करुन जखमींना मदत केली गेली. अपघातात पती - पत्नीसह लहान मुलगी मृत झाली आहे. सोमवारी सकाळपासून घाट परिसरात पाऊस सुरु आहे.

असा झाला अपघातः
जानेवाडी ता.मालेगाव येथील काही भाविक खासगी वाहनाने गाडी क्र. एमएच ४१ व्ही ४८१६ ने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. ते औरंगाबादहून कन्नडघाटमार्गे चाळीसगावकडे येत असतांना घाटमार्ग संपण्याच्या एक किमी अगोदर हा अपघात घडला. गाडीचा चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हा काचेवर धुक्यामुळे आलेली वाफ कापडाने पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले. यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. रविवारी घाटात पाऊस व वादळीवा-यासह धुकेही होते. काही ठिकाणी दरडीही कोसळल्या आहेत. पोलिसांनी घाटात वाहने सावकाश व सावधानतेने चालविण्याचे आवाहन केले आहे.

अपघातील मृतः
प्रकाश गुलाबराव शिर्के (वय -६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय -६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय -३५), पूर्वा गणेश देशमुख (वय-८ )
अपघातातील जखमीः 
अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय - २०),
जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय १७), सिध्देश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय - ४), 
रुपाली गणेश देशमुख (वय - ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५ ).

Web Title: Four people from Malegaon killed, 7 injured in horrific accident at Kannada Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.