मराठवाडा शिक्षक निवडणूक: उस्मानाबादेत सर्वाधिक, तर औरंगाबादेत सर्वांत कमी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:56 AM2023-01-31T11:56:14+5:302023-01-31T11:56:52+5:30

सरासरी ८६.०१ टक्के गुरुजींनी बजावला हक्क

Marathwada Teacher Election: Highest turnout in Osmanabad, lowest in Aurangabad | मराठवाडा शिक्षक निवडणूक: उस्मानाबादेत सर्वाधिक, तर औरंगाबादेत सर्वांत कमी मतदान

मराठवाडा शिक्षक निवडणूक: उस्मानाबादेत सर्वाधिक, तर औरंगाबादेत सर्वांत कमी मतदान

googlenewsNext

औरंगाबाद :मराठवाडाशिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी विभागात शांततेत मतदान पार पडले. सरासरी ८६.०१ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सर्वाधिक ९२.३८ टक्के मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात झाले, तर सर्वांत कमी ७९.४० टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले. २ फेब्रुवारी रोजी या १४ उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागेल. चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्रामसमोरील कंपनीच्या आवारात मतमोजणी होईल. सुमारे १०० टेबलवर मतमोजणी होणार असल्यामुळे निकाल लवकर हाती येऊ शकतो.

विभागात २२७ मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. ४६,७८० पुरुष, तर १४,७४९ महिला मतदारांचा समावेश होता. ६१ हजार ५२९ मतदारांपैकी ५३ हजार ६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेड जिल्ह्यात सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जालना ८१.९९ टक्के, परभणी ९०.१७ टक्के, हिंगोली ९१.२७ टक्के, नांदेड ८६.४५ टक्के, लातूर ८५.७६, तर बीडमध्ये ९०.२७ टक्के मतदान झाले. २०१७ च्या तुलनेत १ हजार १८ मतदान जास्त झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. विक्रम काळे यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे किरण पाटील यांनी अपर तहसील कार्यालय, औरंगाबाद येथे मतदान केले. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी कंधार तालुक्यात मतदानाचा हक्क बजावला. शिक्षक सेनेचे मनोज पाटील यांनी रेल्वे स्टेशन भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. काळे यांनी कुठेही प्रचार कार्यालय उघडले नव्हते. नेटवर्क आणि तीन टर्ममधील कामांच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढविली. किरण पाटील यांनी पक्षाच्या नेटवर्कवर मैदानात उडी घेतली.

जुन्या पेन्शन योजनेवरूनच प्रचार.....
यावेळच्या निवडणुकीत जुनी पेन्शन लागू करण्यावरून जोरदार प्रचार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारला दोषी ठरविले, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेन्शन योजनेवरून राज्यातील सत्ताधारी वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे प्रत्युत्तर दिले. आ. काळे कुटुंबांचे २००२ पासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्मकबन्सीच्या वातावरणाची लहर निवडणुकीत होती. भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी त्या वातावरणाचा फायदा घेत प्रचार केला. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी, तर भाजपचे नितीन कुलकर्णी यांनी बंडखोरी केली. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव, शिक्षक समन्वय संघाचे उमेदवार मनोज पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला. शिवाय संजय तायडे, कालिदास माने यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. २०१७ साली २० उमेदवार मैदानात होते. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते फुटली होती. यावेळीदेखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

५० वर्षांत मतदारसंघावर कुणाचे नेतृत्व?
२००४ पर्यंत शिक्षक संघाचे वर्चस्व मतदारसंघावर राहिले. १९७४ साली पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक झाली. तेव्हा शिक्षक संघाचे डी. के. देशमुख आमदार झाले. १९८६ पर्यंत त्यांनीच मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर १९९२ पर्यंत राजाभाऊ उदगीरकर यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. १९९८ पर्यंत पी. जी. दस्तूरकर हे आमदार होते. २००४ पर्यंत प. म. पाटील यांनी नेतृत्व केले. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव काळे यांनी शिक्षक संघाकडून हा मतदारसंघ हिसकावला. २००६ पासून २०२३ पर्यंत विक्रम काळे यांनी या मतदारसंघातून हॅट्ट्रिक केली. भाजपाने २००६ पासून या मतदारसंघाकडे पूर्ण ताकदीने लक्ष देण्यास सुरुवात केली. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत यावेळच्या निवडणुकीत झाली.

Web Title: Marathwada Teacher Election: Highest turnout in Osmanabad, lowest in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.