Drought In Marathwada : पाण्याचे हाल; मजुरीवरच पुढचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:25 PM2018-10-09T12:25:39+5:302018-10-09T12:28:22+5:30

गोदाकाठचा पट्टा आणि कापसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यावर यंदा दुष्काळछाया गडद झाली आहे.

Drought in Marathwada: water situation is very poor ; future is depended on the wage | Drought In Marathwada : पाण्याचे हाल; मजुरीवरच पुढचा काळ

Drought In Marathwada : पाण्याचे हाल; मजुरीवरच पुढचा काळ

googlenewsNext

- सखाराम शिंदे, खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड. 

गोदाकाठचा पट्टा आणि कापसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यावर यंदा दुष्काळछाया गडद झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने झाले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. आणेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने गेवराईपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या खळेगाव परिसराची पाहणी केली तेव्हा अतिशय विदारक स्थिती समोर आली. पिके कोमेजली, पाण्याची भीषण स्थिती आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे येत्या काळात पशुधन कसे जगवायचे? असा इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न. 

एक तर शहरात मजुरी करावी लागेल, नाही तर ऊसतोडीला जावे लागेल, असे स्वत:समोर दोनच पर्याय असल्याचे हे ग्रामस्थ सांगतात.फेब्रुवारीत खळेगाव परिसरात गारपिटीमुळे  हरभरा, ज्वारी, बाजरीचे मोठे नुकसान झाले होते. घरांची पडझड आणि झाडे पडली होती.  यातून सावरत जून-जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या; पण पदरी निराशाच पडली. जवळपास ६ हजार लोकसंख्येच्या या गावालगत अमृता नदी आहे. नदीसह गावाच्या वरील भागातील दोन बंधारे असले तरी ते कोरडेच आहेत. नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले. शेतकरी  चार महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

प्रामुख्याने कापूस आणि बाजरीचे पीक येथील शेतकरी घेतात. यावर्षी खळेगावात २१७ मि. मी. पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो ४० टक्के बरसला. यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीनची पेरणी केली; मात्र पावसाअभावी हातातोंडाशी येणारा थोडाफार घासही निसर्गाने हिरावला आहे. विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. 

सर्वाधिक पेरा ऊस, कापसाचा 
गेवराई तालुक्यातील पेरणीलायक क्षेत्र १ लाख ३४  हजार हेक्टर असून, या खरीप हंगामात ९८  हजार १११ हेक्टरवर पेरा झाला.  यात २० हजार ५००  हेक्टरवर ऊस, तर ७४ हजार ५००  हेक्टरवर कापसाची लागवड झाली. उर्वरित क्षेत्रात तूर, मूग, बाजरीची पेरणी झाली.

स्थलांतर  वाढणार 
खळेगाव येथून दरवर्षी ऊसतोड मजुरांच्या ३० टोळ्या (जवळपास ६०० व्यक्ती) ऊसतोडीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावर्षी पाऊस नसल्यामुळे स्थलांतर  करणाऱ्यांचा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. 

नुकसान भरून निघणार नाही
तालुक्यात यावर्षी ४४ टक्के पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती असून, शेतीचे झालेले मोठे नुकसान भरून निघणार नाही.  शासनाकडून आदेश मिळताच तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करून पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. 
- संदीप स्वामी, तालुका कृषी अधिकारी, गेवराई. 

बळीराजा काय म्हणतो?
- पाऊस कमी झाल्याने शेतात पेरलेली तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिके करपली. मूग तर पावसाअभावी वाया गेला. पैशाची चणचण आहे. पाणीटंचाई भासत आहे. शासनाने जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय, तसेच चारा छावणी सुरू केली पाहिजे. - मच्छिंद्र गावडे  

- आॅक्टोबरमध्येच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. परतीचा पाऊस पडला नाही तर आम्हाला ऊसतोडीला गेल्याशिवाय पर्याय नाही. -  मनोज शेंबडे

- पावसाअभावी पिके करपून गेली. खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे. खरीप तर गेले, आता पाऊस झाला तरच पाण्याची सोय होईल. - राजेंद्र डाके 

- २०१२ पासून या भागातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. गावालगतची नदी कोरडी असून, विहिरींची पाणी पातळी घटली आहे.  परतीचा पाऊस पडला, तर रबीची पेरणी करता येईल. सध्याची परिस्थिती अवघड आहे. - उमेश शिंदे 

Web Title: Drought in Marathwada: water situation is very poor ; future is depended on the wage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.