चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:32 PM2024-05-03T13:32:34+5:302024-05-03T13:34:24+5:30

कसे होणार? : वर्षभरापासून नळ योजना बंद, बोअरवेलही आटल्या

Women exercise in the hot sun for chali-neelit water | चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत

Water Scarcity in Chandrapur Villages

लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती :
राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरात पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावातील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. चार्ली-निर्ली येथील नळ योजना मागील वर्षभरापासून बंद असल्याने येथील महिलांना रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दंडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

राजुरा तालुक्यात वेकोलीच्या उत्खननामुळे पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे. परिसरातील नाले उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले असून गावातील विहिरी व बोअरवेलसुद्धा कोरड्या पडल्या आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नळ योजनाही बंद पडल्या आहेत. चार्ली -निली येथील नळ योजना पाण्याच्या स्रोताअभावी मागील वर्षभरापासून बंद पडली आहे. या नळ योजनेकरिता पूर्वी वर्धा नदीवरून पाणी आणले जात होते. परंतु, नदी लांब असल्याने अनेकदा पाइपलाइन लीक होऊन नळ योजना बंद राहत होती. म्हणून गावाजवळील नाल्यावर पाण्याचे स्रोत तयार करण्यात आले. परंतु, तेही आटले. त्यानंतर वेकोलीच्या सहकार्याने नळ योजनेकरिता पोवनी येथून पाणी आणण्यात आले. परंतु, महामार्गाच्या कामात पाइपलाइन फुटल्यामुळे नळ योजना वर्षभरापासून बंद पडली आहे.

सध्या नळ योजनेसाठी जल जीवन योजनेतून कढोली शिवारात नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात आले. परंतु, कंत्राटदाराच्या व प्रशासनाच्या  गलथान कारभारामुळे पाणीटंचाई असतानाही व मे महिना सुरू होऊनही नळ योजना सुरू झालेली नाही. गावातील विहिरी पूर्णतः आटल्या आहेत.

आठपैकी चार बोअरवेल बंद
गावात आठ बोअरवेल असून त्यातील चार बंद आहेत, तर केवळ चार बोअरवेलला थोडे थोडे पाणी येते. महिलांना तासनतास रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दांडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्याकरिता गावातील जवळपास ६० टक्के लोकांनी घरी बोअरवेल मारल्या. परंतु, त्यातील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्या असून काहींना थोडे-थोडे पाणी येत आहे. अशी परीस्थिती असतानाही प्रशासनाचे याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष आहे.

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाही
चार्ली गावातील दिनकर आवारी यांनी पाणीटंचाई पाहता घरी २००-२५० फूट खोलीच्या दोन ठिकाणी बोअरवेल खोदल्या. परंतु, दोन्ही बोअरवेलला घोटभरही पाणी लागले नाही. त्यात त्यांचा ५० हजारांचा खर्च वाया गेला. यावरून वेकोली परिसरात पाण्याची पातळी किती खोल गेली आहे हे दिसून येते.

पाण्याच्या स्रोताअभावी नळ योजना कुचकामी ठरली. वेकोलीच्या सहकार्याने सुरू असलेली पाइपलाइन महामार्गाच्या कामात तुटली. ती दुरुस्त करण्याच्या सूचना वेळोवळी वेकोलिला दिल्या. सध्या कढोली शिवारात तयार करण्यात आलेल्या स्रोतावरून नळयोजना सुरू करण्याचे काम सुरू आहे. लवकरच नळ योजना सुरू होईल.
-विजय निवलकर, सरपंच, चार्ली.

 

Web Title: Women exercise in the hot sun for chali-neelit water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.