दुर्गापूर पोलिस ठाण्यासमोर महिनाभरातच दुसरी हत्या; चाकूने सपासप वार करून एकाला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 11:09 AM2022-12-14T11:09:23+5:302022-12-14T11:20:41+5:30

चाकू हातात घेऊन आरोपी पोहोचला थेट ठाण्यात

man stabbed to death in front of Durgapur police station chandrapur | दुर्गापूर पोलिस ठाण्यासमोर महिनाभरातच दुसरी हत्या; चाकूने सपासप वार करून एकाला संपविले

दुर्गापूर पोलिस ठाण्यासमोर महिनाभरातच दुसरी हत्या; चाकूने सपासप वार करून एकाला संपविले

googlenewsNext

चंद्रपूर : एका गुंडप्रवृत्तीच्या इसमाची धडावेगळे मुंडके करून हत्या करण्यात आली. ही घटना दुर्गापूर पोलिस ठाण्यापासून काहीच अंतरावर घडली होती. या घटनेला महिना लोटत नाही तोच मंगळवारी दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या अगदी समोर असलेल्या ऊर्जानगर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात एका इसमाची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात दाखल होऊन पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. ही थरारक घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास घडल्याने नागरिक पुन्हा एकदा भयभीत झाले आहे.

विकास गणवीर (५०, रा. कोंडी ऊर्जानगर) असे मृतकाचे नाव आहे. प्रथम वाढई असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली. ही हत्या प्रेमप्रकरणातून करण्यात आल्याची चर्चा आहे. प्रथम वाढई हा एका मुलीवर प्रेम करीत होता. यावरून विकास गणवीर यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची चर्चा आहे. याच भांडणातून प्रथमने आज रात्री विकासला ऊर्जानगर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात गाठले. दरम्यान, दोघांत पुन्हा वाद झाल्याचे समजते. अशातच प्रथम विकासवर धारदार चाकूने हल्ला चढवून ठार केल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यानंतर हातात चाकू घेऊन प्रथम हा अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यात गेला. तेथे त्याने आपण हत्या करून आलो असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिस काय करतात?

दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. तेथे कायद्याला कोणीही जुमानत नसल्याचे काही घटनांवरून लक्षात येते. ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ काही जणांनी एका गुंड प्रवृत्तीच्या युवकाची मुंडके धडावेगळे करून हत्या केली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही दुसरी घटना घडली आहे. या घटनांनी पोलिसांचा वचकच नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झालेली आहे. यापूर्वीही या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हत्या झालेल्या आहेत हे विशेष.

Web Title: man stabbed to death in front of Durgapur police station chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.