पोलिसांसह प्रत्येकाने व्हावे आरोग्याप्रती जागृत : रविंदर सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 04:21 PM2019-06-28T16:21:38+5:302019-06-28T16:22:09+5:30

‘आयर्न मॅन’नी साधला विविध विषयांवर संवाद

Everybody with the police can be awake to health: Ravinder singhal | पोलिसांसह प्रत्येकाने व्हावे आरोग्याप्रती जागृत : रविंदर सिंगल

पोलिसांसह प्रत्येकाने व्हावे आरोग्याप्रती जागृत : रविंदर सिंगल

googlenewsNext

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आरोग्य हे सर्वांसाठी महत्त्वाचे असते. सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणारे पोलीस सुदृढ असावेत, अशी अपेक्षा असते. विशेषत: पोलीस अधिकाऱ्यांकडे लीडर म्हणून पाहिले जाते. आपणही असे बनावे, असे पोलीस कर्मचाऱ्यांचे ध्येय असते. शिवाय समाजात, नागरिकांमध्ये जातो, तेव्हा प्रामुख्याने तरुणांपुढे आपली कोणती प्रतिमा जाते, हे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे आरोग्याप्रतीपोलिसांबरोबर प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे, असे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ‘आयर्न मॅन’ रविंदर सिंगल म्हणाले.

रविंदर सिंगल यांनी गुरुवारी (दि.२७) ‘लोकमत’ला सदिच्छा भेट देत संपादकीय विभागाशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन सिंगल यांचे स्वागत के ले. याप्रसंगी सिंगल यांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला. फ्रान्समध्ये २०१८ मध्ये ‘ट्रायथलॉन’मध्ये त्यांनी ‘आयर्न मॅन’ म्हणून किताब पटकवला आहे. 

शारीरिक क्षमतांची कस लागणारी फ्रान्समधील ही स्पर्धा  मानाची आणि अतिशय खडतर मानली जाते. पोलिसांना २४ तास सेवा द्यावी लागते. प्रशिक्षणात शारीरिक आरोग्यावर अधिक लक्ष दिले जाते. तेव्हा प्रश्न पडतो एवढे का केले जाते. नाशिक येथे असताना ३ वर्षे मॅरेथॉन घेतली. तेव्हा जे कधी धावले नव्हते, अशा सर्व सहकाऱ्यांनी धावण्यास सुरुवात केली. आता अनेक कर्मचारी आरोग्यासाठी काय करू, अशी विचारणा करतात. त्यामुळे आरोग्याप्रती पोलिसांमध्ये जनजागृती वाढत आहे. पोलीस म्हटले की, पोट बाहेर आलेले कर्मचारी, ही प्रतिमा आता बदलत आहे, असे सिंगल म्हणाले.

‘कम्युनिटी पोलिसिंग’द्वारे सामाजिक उपक्रम
रविंदर सिंगल म्हणाले की, मराठवाड्यात आल्यानंतर मला या ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न जाणवला. त्यामुळे कम्युनिटी पोलिसिंग’द्वारे सामाजिक उपक्रम राबविताना पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात, जालना, बीड येथे पोलिसांतर्फे श्रमदान करून बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मी स्वत: त्यात सहभागी होतो. अशा प्रकारे पोलीस समाजासाठी पुढे येत असल्याचा संदेश गेल्याने इतर लोकही त्यासाठी पुढे सरसावत आहेत, असे ते म्हणाले. 

गर्दीच्या व्यवस्थापनावर पीएच.डी. 
२००३ मध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा झाला. २००८ मध्ये नांदेड येथे गुरुदा-गद्दी झाले. या दोन्ही ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. २०१५ मध्ये पुन्हा कुंभमेळा झाला. पहिल्या शाही स्नानानंतर तेव्हा अनेक अडचणी आल्या. त्यामुळे पुन्हा मला बोलाविण्यात आले. पंढरपूर, हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन येथेही गेलो होतो. गर्दीचे व्यवस्थापन, त्याचा अभ्यास हे माझे ‘पॅशन’ आहे. त्यामुळे गर्दीच्या व्यवस्थापनावर (क्राऊड मॅनेजमेंट) नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी  केली आहे. २०२१-२२ च्या हरिद्वार कुंभमेळ्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, असे रविंदर सिंगल यांनी सांगितले. 

नागपूर रेल्वे ‘एसपी’ आणि मुंबई रेल्वे आयुक्त म्हणून कार्यरत होतो. रेल्वेच्या हद्दीअंतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास केला जातो; परंतु याठिकाणी पायाभूत सुविधा मर्यादित असतात. मनुष्यबळाचा अभाव असतो. रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरे नसतात. मुंबईत दररोज किमान १२ लोकांचा रेल्वे रुळावर मृत्यू होतो. तेवढेच लोक जखमी होतात. अनेक लोकांची ओळख पटत नाही. ‘शोध’ नावाच्या संकेतस्थळावरून त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. गोदिया येथे रेल्वेस्टेशनवर तीन लहान मुले पाहिली. दिल्लीहून चंदीगडला जाताना एका लहान मुलाला स्वत:च्या शर्टाने रेल्वेची बोगी स्वच्छ करताना पाहिले. तेव्हा लहान मुलांसाठी काहीतरी करण्याची भावना निर्माण झाली. तेव्हा नागपूर आणि ठाणे येथे  अशा मुलांसाठी दोन शाळा सुरू केल्या. याविषयी मोठे समाधान वाटते. एखाद्या महिलेला चोरीला गेलेले मंगळसूत्र परत देतो, एखाद्या युवकाला दुचाकी जेव्हा परत करतो, तेव्हा त्यांच्या मनात पोलिसांविषयीची प्रतिमा बदलते. त्यामुळे मुद्देमाल परत देण्यावर सर्वाधिक भर असल्याचे त्यांनी सांगितले.

‘0’ एफआरआय कुठेही नोंदवा, पोलीस चौकीसाठी प्रयत्न
गुन्हा दाखल करण्यासाठी हद्दीवरून नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागते. याविषयी बोलताना रविंदर सिंगल म्हणाले की, नागरिकांना त्यांची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदविता येते. एखाद्या हद्दीत गुन्हा घडल्यास त्याच हद्दीतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, अशी सक्ती पोलीस करू शकत नाहीत. तक्रार नोंदवून ती योग्य त्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. बदलत्या काळाप्रमाणे पोलिसांचे खबरी नेटवर्कही आधुनिक झाले आहे. ते फोन करतात, छायाचित्र, चित्रीकरण पाठवितात. त्याचा मोठा फायदा होतो, असेही त्यांनी म्हटले.

ब्लॉग लेखन, तीन पुस्तके
दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून वेळ काढून रविंदर सिंगल हे नियमितपणे आरोग्य, पर्यावरण यासह अनेक विषयांवर ब्लॉग लिहितात. याशिवाय त्यांनी तीन पुस्तकेही लिहिलेली आहेत. पोलीस अधिकारी म्हणून या क्षेत्रात प्रामुख्याने लोकांसाठी काम करता येते. त्यामुळे हा एक सामाजिक भाग आहे, असे रविंदर सिंगल म्हणाले.

Web Title: Everybody with the police can be awake to health: Ravinder singhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.