“उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 05:12 PM2024-04-26T17:12:49+5:302024-04-26T17:13:00+5:30

Shiv Sena Shinde Group News: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंद्यात पडू नये, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले.

shiv sena shinde group deepak kesarkar and uday samant criticize aaditya thackeray and thackeray group in lok sabha election 2024 | “उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला

“उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला

Shiv Sena Shinde Group News: महाराष्ट्राचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा राहिलेला आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे यांनी काम केलेले आहे. चिन्ह कुठलेही असले तरी महायुती म्हणून मतदान होत असते. त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी वैभव नाईक तसेच आदित्य यांच्यावरही टीका केली. प्रत्येक गोष्टीत कुत्सित बोलून विकास होत नाही. जर्मनीबाबत लेखी करार झालेला आहे. वैभवजींचा स्थानिक पातळीवर गावागावात काम करण्यावर भर असतो. त्यामुळे नोकऱ्या, मोठ्या इंडस्ट्री यांबाबत ते फारशी माहिती घेत नसतील, असा खोचक टोला दीपक केसरकर यांनी केला.

उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही दीपक केसरकर यांनी हल्लाबोल केला. खोटे उत्कृष्ट कसे बोलावे याचा जिवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत. खोटे बोलणाऱ्यांमध्ये भारतात एक नंबर काढला तर हे राजपुत्र एक नंबरला जातील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंद्यात पडू नये. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा डाव निश्चितच करण्यात आलेला होता, असे दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे यांनी कोकणाला न्याय दिलेला आहे. ४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील हा शब्द देतो. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून टेक ऑफ होईल. स्वतःची निवडणूक आहे, असे समजून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करत, उद्योग परराज्यात गेले हे पाप ठाकरे गट आणि त्यांच्या प्रमुखांचे आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत राहुल गांधी अशी ही लढाई आहे. सर्वच्या सर्व जागा या महायुतीच्या निवडून येतील ही खात्री आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत म्हणाले.
 

Web Title: shiv sena shinde group deepak kesarkar and uday samant criticize aaditya thackeray and thackeray group in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.