औरंगाबादेत आवक घटल्याने धान्य अडत व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:40 PM2018-11-21T16:40:23+5:302018-11-21T16:46:51+5:30

मक्याचे यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटले व आवक तीन महिने आधीच संपुष्टात आली आहे.

Due to the incessant fall in Aurangabad, due to obstruction of grain trade, | औरंगाबादेत आवक घटल्याने धान्य अडत व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर

औरंगाबादेत आवक घटल्याने धान्य अडत व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर

googlenewsNext
ठळक मुद्दे मक्याची आवक तीन महिने आधीच संपली तूरची झाली तुरळक आवक 

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याचा अडत बाजार ज्या मक्यावर आधारित आहे. त्या मक्याचे यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटले व आवक तीन महिने आधीच संपुष्टात आली आहे. नवीन तूर किती येईल, याची शाश्वती नाही आणि गहू, ज्वारीचा पेराही कमी आहे. परिणामी, पुढील १० महिने अडत बाजारासाठी कठीण जाणार आहे. यापुढे परपेठेतील शेतमालावरच अवलंबून राहावे लागणार आहे. 

औरंगाबाद जिल्हा मक्याच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. येथील मक्याला देश व विदेशातील विविध स्टार्च फॅक्टरीमधून मागणी असते. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याचा अडत बाजारातील ७० टक्के वार्षिक व्यवहार एकट्या मक्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा ऐनवेळेवर पाऊस पडला नाही. मक्यात दाणेच भरले नाही. यामुळे मक्याचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घटले आहे. परिणामी, धान्याच्या अडत बाजारात मक्याची नवीन आवक आॅक्टोबरपासून सुरू होते आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक संपुष्टात येते. मात्र, यंदा केवळ महिनाभरच हंगाम राहिला. महिनाभरात केवळ २१३२९ क्विंटल मक्याची आवक झाली.

मागील वर्षी या काळात २४४४३ क्विंटल मका विक्रीसाठी आला होता. एकूण आवकपैकी केवळ १० टक्के मका अडतमध्ये विक्रीला आला.  मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, यंदा  दरवर्षीपेक्षा मुगाची आवक केवळ १५ टक्के राहिली. उडीदही ५ टक्केच विक्रीला आला आहे. आतापर्यंत नवीन तुरी बाजारात येत असतात; पण अजून आवक सुरू झाली नाही. ग्रामीण भागात पाहणी केली असता १५ टक्केसुद्धा तूर विक्रीसाठी येणार नाही, अशी शक्यता आहे. रबीत गहू, ज्वारीचा पेराही कमी आहे. यामुळे आता रबीचे पीकही हाती लागणार नाही. यामुळे पुढील वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत अडत व्यवहार ठप्प राहणार, असे दिसते. व्यापाऱ्यांना आता परराज्यातून धान्य आणून येथे विकावे लागणार आहे. 

यंदा मूग, उडीद, बाजरीही कमी
कृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, मक्याच्या व्यवहारावरच येथील अडत बाजार टिकून आहे; मात्र दुष्काळामुळे महिनाभरातच मक्याची आवक कमी झाली, तसेच यंदा मूग, उडीद, बाजरीही विक्रीला कमी आली. याचा मार्केट फीवर मोठा परिणाम झाला आहे. महिनाअखेरीस याची आकडेवारी उपलब्ध होईल. 

अडत्यासोबत हमालांच्या रोजगारावरही परिणाम 
स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारी धान्य, कडधान्याची आवक ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे आता जे स्थानिक शेतीमालावर अवलंबून आहेत असा अडत व्यवहार पुढील १० महिने ठप्पच राहील. त्यासाठी आता परपेठेतून माल मागवून तो विक्री करावा लागेल. येथे ७५ अडत व्यापारी आहेत, तर १०० च्या जवळपास हमाल काम करीत आहेत, तसेच ५० पेक्षा अधिक लोडिंगरिक्षावालेही येथील व्यवहारावर अवलंबून आहेत. त्यांनी दुसरीकडे काम केले नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. 
- देवीदास कीर्तिशाही, हमाल प्रतिनिधी

Web Title: Due to the incessant fall in Aurangabad, due to obstruction of grain trade,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.