जायकवाडीत पोहोचेल ६ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:55 PM2018-11-01T22:55:48+5:302018-11-01T22:58:29+5:30

नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे आणि अन्य कारणांनी ६ टीएमसी पाणीच पोहोचण्याचा अंदाज आहे. तब्बल ३ टीएमसी पाण्याच्या नुकसानीची भीती आहे.

6 TMC water will arrive in Jayakwadi | जायकवाडीत पोहोचेल ६ टीएमसी पाणी

जायकवाडीत पोहोचेल ६ टीएमसी पाणी

googlenewsNext
ठळक मुद्दे ३ टीएमसीचे नुकसान : कोरडे नदीपात्र, वाळू उपशाच्या खड्ड्यांमुळे पाण्यात घट होण्याचा अंदाज

औरंगाबाद : नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे आणि अन्य कारणांनी ६ टीएमसी पाणीच पोहोचण्याचा अंदाज आहे. तब्बल ३ टीएमसी पाण्याच्या नुकसानीची भीती आहे.
निळवंडे धरणातून गुरुवारी सकाळी प्रारंभी ४,२५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग दुपारी वाढविला. येथून ७ हजार ५०५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर मुळा धरणातून ८ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दारणा धरणातून ११ हजार १५८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गंगापूर धरणातून ३ हजार ५२४, तर मुकणे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पालखेड धरण समूहातून जायकवाडीसाठी ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
आज दुपारपर्यंत येणार पाणी
जायकवाडीत २४ ते २६ तासांत १४० कि.मी.चा प्रवास करून सर्वात आधी मुळा धरणातील पाणी पोहोचण्याचा अंदाज आहे, तर सर्वात शेवटी २२५ कि.मी.चा प्रवास करून जवळपास ३८ तासांत गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे जायकवाडीत मुळा धरणाचे पाणी शुक्रवारी दुपारपर्यंत पोहोचेल. त्यानंतर सायंकाळपर्यंत उर्वरित धरणांचे पाणी पोहोचेल, अशी शक्यता आहे.
पाणी चोरीची भीती
जायकवाडी धरणात पाणी पोहोचण्यापूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतरीत्या खेचले जाते. त्यामुळे नदीलगतच्या भागांमध्ये पोलीस प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोटारींद्वारे पाणी चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद ठेवून खबरदारी घेण्यात येत आहे; परंतु डिझेल मोटारींद्वारे पाणी शेततळे, विहिरीत वळविण्याच्या प्रयत्नांमुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्यात मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पाण्याचे चित्रीकरण
वरच्या धरणांतून पाणी सोडण्यापूर्वी आणि प्रवास सुरू झाल्यानंतर चित्रीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक धरणावर चार जणांचे पथक देखरेख करण्याचे काम करीत आहे. यामध्ये पाण्याची पातळी, पाण्याचा होणारा विसर्ग यांच्या नोंदी घेण्याचे काम केले जात आहे. ऊर्ध्व भागातील धरणांपासून ते पैठण धरणापर्यंत विविध ठिकाणी पाणी मोजण्यात येणार आहे. मराठवाड्याला हक्काचे पूर्ण पाणी सोडले जाईल, यावर पाटबंधारे विभागाकडून करडी नजर ठेवली जात आहे.
जायकवाडीत २९.६२ टक्के पाणीसाठा
गतवर्षी शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणात गुरुवारी २९.६२ टक्के पाणीसाठा होता. वरच्या धरणांतून येणाºया पाण्यामुळे किमान काही प्रमाणात जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल.
तीन कारणांनी पाण्याचे नुकसान
जायकवाडीसाठी सोडलेल्या पाण्यापैकी काही पाण्याचे तीन कारणांनी नुकसान होऊ शकते. यात नदीपात्रातील जमिनीत पाणी मुरते. ऊन आणि हवेचादेखील परिणाम होतो. मोटारी लावून पाणी चोरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हे सगळे धरून किमान ६.१० टीएमसी पाणी जायकवाडीत येईल, अशी आशा आहे, असे जलतज्ज्ञ शंकर नागरे म्हणाले.
६ टीएमसी अपेक्षित
यंदा पावसाळा लवकरच संपला आहे. दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने नदीचे पात्र बºयाच ठिकाणी कोरडे झाले आहे. वाळूच्या उपशामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात. या सगळ्या कारणांमुळे किमान ५ ते ६ टीएमसी पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित आहे.
-अजय कोहिरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

Web Title: 6 TMC water will arrive in Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.