गावात सतत मारहाण, अपमानाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 11:19 AM2022-01-13T11:19:01+5:302022-01-13T11:34:26+5:30

गावात काही जणांकडून सतत होणारा अपमान, मारहाणीला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केली.

young man dies by suicide after harassment by some villagers | गावात सतत मारहाण, अपमानाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल

गावात सतत मारहाण, अपमानाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल

Next
ठळक मुद्देसात जणांवर गुन्हामृतदेह वडकी पोलीस ठाण्यात नेला

यवतमाळ : त्यांच्याकडून सतत मारहाण केली जाते, माझे गावात राहणे कठीण झाले आहे, म्हणून मी जीवन संपवत आहे, अशी चिठ्ठी लिहून युवकाने गळफास घेत जीवन संपवले. ही घटना वडकी (ता. राळेगाव) येथे मंगळवारी घडली. दरम्यान, गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृतदेह वडकी पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय भास्कर आडे (२८, रा. वडकी) असे मृताचे नाव आहे. त्याने स्वत:च्या घरातच गळफास लावला. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने ज्या लोकांकडून मारहाण आणि त्रास होत होता त्यांची नावे नमूद केली. याच आधारे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडकी पोलीस ठाण्यालगतच अजयचे घर आहे. तेथून जवळच राहत असलेल्या लोकांकडून त्याला त्रास होत होता.

शवविच्छेदन केल्यानंतर अजयचा मृतदेह पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. पोलिसांनी तेथून अर्ध्या तासातच चिठ्ठीत नावे असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे करीत आहेत.

अशी आहे आरोपींची नावे

अजय भास्कर आडे याच्या आत्महत्येप्रकरणी प्रेमिला भास्कर आडे यांनी तक्रार नोंदविली. यानुसार सुजल भीमा सलाम (२५), पिंटू धुर्वे (४०), राेहित पिंटू धुर्वे (२२), अक्षय सुनील आडे (२४), गौरव सुरेश येलके (२४), अनिल करपते, प्रतीक धुर्वे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल व प्रतीक घटनेपासून फरार आहे.

Web Title: young man dies by suicide after harassment by some villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.