यवतमाळ : दोन ठिकाणी धाडी घालून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वडगाव रोड पोलिसांनी दोन लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई वडगाव रोड हद्दीतील अमराईपुरा आणि शारदा चौकात करण्यात आली. लक्ष्मीबाई रामनारायण यादव (६०) आणि अतिश रामनारायण यादव (३२) दोघे रा. तारपुरा अशी अटकेतील दारू विक्रेत्यांची नावे आहे. मात्र अमराईपुरा येथील दारू विक्रेते कारवाईदरम्यान पसार होण्यात यशस्वी झाले. त्यामुळे त्यांच्या नावांची नोंद घेण्यात आली नव्हती. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी आणि उमेदवारांकडून दारू व पैशाचे आमिष दाखविले जाऊ नये म्हणून सोमवारपासून बुधवारपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्यात आली. नेमका या बाबीचा फायदा घेत अवैध दारू विक्रेत्यांनी मद्याचा साठा करून ठेवला होता. याची गोपनीय माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने आणि वडगाव रोड ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांना मिळाली. त्यांनी तत्काळ अमराईपुरा येथील दारू गुत्यावर धाड घातली. यावेळी देशी दारूच्या ३१ पेट्या, १२ पेट्या बीअर, विदेशी मद्याच्या २८२ बाटल्या असा एकूण एक लाख ४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शारदा चौकातील दारू गुत्त्यावर धाड घातली. यावेळी आतिश यादव याच्या घरातील पलंगाच्या बॉक्समधून ११ पेट्या देशी दारू, सहा पेट्या बीअर आणि एक फ्रीज जप्त करण्यात आली. कारवाईत एपीआय संतोष केंद्रे, फौजदार संतोष माने, एएसआय अजय ढोले, जमादार उद्धव टेकाम, राहुल मनवर, नरेंद्र बगमारे, तुषार नेवारे, प्रमोद मडावी, विजय जाधव, इकबाल शेख, वसीम शेख आदींनी सहभाग घेतला होता.स्थानिक गुन्हे शाखेला सायंकाळी उशिरा दोन ठिकाणच्या दारूगुत्यांची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक तेथे कारवाई करण्याच्या प्रयत्नात होते. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कारवाई केली नव्हती. या शिवाय जिल्ह्यात अन्य काही ठिकाणीही किरकोळ स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
यवतमाळात दोन लाख रुपयांची अवैध दारू जप्त
By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST