बेलगव्हाणच्या जंगलात महिलेचा खून;अनैतिक संबंध की नरबळी, पोलिसांना संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:46 IST2020-01-15T18:46:12+5:302020-01-15T18:46:16+5:30
यवतमाळ : दिग्रस ते पुसद मार्गावरील बेलगव्हाण घाटानजीकच्या सिंगद-वडद जंगलात बुधवारी एका महिलेचा शिर नसलेला निर्वस्त्र मृतदेह आढळला. या ...

बेलगव्हाणच्या जंगलात महिलेचा खून;अनैतिक संबंध की नरबळी, पोलिसांना संशय
यवतमाळ: दिग्रस ते पुसद मार्गावरील बेलगव्हाण घाटानजीकच्या सिंगद-वडद जंगलात बुधवारी एका महिलेचा शिर नसलेला निर्वस्त्र मृतदेह आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हा खून नरबळीसाठी की अनैतिक संबंधातून झाला, याचा पोलीस तपास घेत आहे.
दिग्रस आणि पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सीमेवरील काळी दौ. वनपरिक्षेत्रात येणाºया सिंगद वडद जंगलात बुधवारी सकाळी एका महिलेचा निर्वस्त्र मृतदेह आढळला. या मृतदेहाला मुंडके नव्हते. केवळ धडच घटनास्थळी पडून होते. घटनेची माहिती मिळताच दिग्रस, पुसद आणि महागावचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ दिग्रस तालुक्यातील सिंगद आणि महागाव तालुक्यातील वडद-ब्रम्ही गावाच्या मधोमध आहे. या जंगलात एक मंदिर आहे. त्याच परिसरात हा मृतदेह आढळला.
मंदिराच्या ओट्यावर रक्ताचा सडा आढळल्याने भिलवाडी येथील एका व्यक्तीने गावात जाऊन नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता अंदाज ३० वर्षीय महिलेचा शिर नसलेला निर्वस्त्र मृतदेह आढळला. वडद-ब्रम्हीच्या पोलीस पाटलांनी तत्काळ पुसद ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन व पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र पोलीस हद्दीचा प्रश्न उपस्थित झाल्याने दिग्रस पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे मंदिराच्या ओट्यावर खून झाल्याचा अंदाज वर्तविला. खून करणारे एकापेक्षा जास्त असावे असाही पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी मुंडके कापताना महिलेने आरोपींसोबत झटापट केल्याचे दिसून आले. या झटापटीत महिलेचे चार दात ओट्यावर पडल्याचे आढळून आले. घटनास्थळी दारूच्या रिकाम्या बॉटलही आढळून आल्या. तसेच वहीच्या दोन कागदावर काही तरी लिहिल्याचे आढळले. पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी महिलेच्या बोटांचे ठसे घेतले. त्यावरून तिचे आधार कार्ड काढले जाणार आहे. आरोपींनी महिलेवर अत्याचार केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला. मात्र हा सर्व प्रकार उत्तरीय तपासणीअंतीच उघड होणार आहे. सदर महिला परिसरातील नसून बाहेरील असावी असाही कयास वर्तविला जात आहे.
दरम्यान सदर महिला उच्चभ्रू घरातील असावे असे मृतदेहावर आढळलेल्या दागिन्यांवरून वर्तविले जाते. विशेष म्हणजे आरोपींनी तिच्या हातावर गोंदविलेला भागही कापून नेला. तसेच सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
श्वान पथकाने दाखविला दिग्रसचा मार्ग
पोलिसांनी घटनास्थळी यवतमाळ येथील श्वान पथकाला पाचारण केले. श्वान दिग्रस रस्त्याच्या बाजूने निघाले. मात्र त्यासमोर ते जाऊ शकले नाही. त्यामुळे आरोपी खून केल्यानंतर दिग्रसकडे गेल्याचे स्पष्ट होते. दरम्यान घटनास्थळी आढळलेल्या वस्तूंवरून हा खून अनैतिक संबंधातून झाला की हा नरबळीचा प्रकार आहे याबाबतही पोलीस तपास करीत आहे.
पोलिसांनी संपूर्ण जंगल पालथे घातले. मात्र महिलेचे मुंडके कुठेही आढळले नाही. घटनास्थळी पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, दारव्हाचे एसडीपीओ उदयसिंह चंदेल, पुसद ग्रामीणचे ठाणेदार चौबे, दिग्रसचे ठाणेदार सोमाजी आमले, वसंतनगरचे ठाणेदार परदेशी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे नीलेश शेळके यांनी पाहणी केली. यावेळी वडदच्या पोलीस पाटील वंदना मनोज पवार, काळी दौ. वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक एस.एस. जाधव उपस्थित होते.