गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

By Admin | Updated: May 30, 2015 02:22 IST2015-05-30T02:22:26+5:302015-05-30T02:22:26+5:30

गुन्हेगारी वर्तुळात अत्याधुनिक शस्त्रे व उपकरणांचा वापर होतो आहे. ते पाहता पोलिसांनीही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा,...

Use technology to investigate crimes | गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

यवतमाळ : गुन्हेगारी वर्तुळात अत्याधुनिक शस्त्रे व उपकरणांचा वापर होतो आहे. ते पाहता पोलिसांनीही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिले.
गुन्हे घडले मात्र आरोपी निष्पन्न होऊ शकले नाही, अशा ‘अन-डिटेक्ट’ गुन्ह्यांचा सिंह यांनी शुक्रवारी संबंधित ठाणेदारांकडून आढावा घेतला. जिल्ह्यात सहा ते आठ खुनांचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागला नाही. सतत प्रयत्न करूनही खून कुणी केला आणि कशासाठी केला हे निष्पन्न होऊ शकलेले नाही. मालमत्तेच्या चोरीचेसुद्धा काही गंभीर गुन्हे अद्याप उघडकीस येऊ शकलेले नाही. या सर्व गुन्ह्यांचा पोलीस ठाणेनिहाय आढावा घेतला गेला. अन-डिटेक्ट गुन्हे असलेल्याच ठाणेदारांना बोलविण्यात आले होते. याबाबत सिंह यांनी ठाणेदारांना मार्गदर्शन केले. गुन्ह्यांचा तपास करताना त्याचा दर्जा कायम रहावा, गुन्हा क्लिष्ट असेल तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा असे सांगताना सिंह यांनी आपले धुळ्यातील काही अनुभवही कथन केले. अवैध धंद्यांवर १०० टक्के नियंत्रण हवे याचे स्मरणही करून दिले गेले. एक तर गुन्हे होण्यापूर्वी त्याला प्रतिबंध घातला जावा आणि तरीही गुन्हा घडलाच तर तो तत्काळ उघडकीस यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सायबर क्राईम विभागाची गुन्ह्यांच्या तपासात मदत घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. (जिल्हा प्रतिनिधी)
रुजू झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन सोईने बदल्या केल्या आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची अडचण मांडण्याची आणि पसंती क्रम सांगण्याची संधी देण्यात आली. बहुतांश त्याच्या पसंतीनुसारच बदलीचे ठिकाण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा, त्यांचे अधिकाधिक कल्याण साधण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
विशेष पोलीस महानिरीक्षकांकडूनही आढावा
गुरुवारी अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एस. उघडे यांनी पाचही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गुन्हेगारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अमरावती परिक्षेत्रातील पाच पैकी चार पोलीस अधीक्षक नवीन आहेत. अकोला वगळता अन्य एसपी बदलले गेले आहे. अकोल्याच्या अपर अधीक्षकांची बदली झाली. मात्र त्यांना आदेश फिरवून पुन्हा तेथेच नियुक्ती दिली गेली. अमरावती एसआरपीएफचे समादेशक म्हणून बदली झालेल्या यवतमाळ येथील अपर पोलीस अधीक्षकांना अद्याप ‘रिलीव्हर’ मिळालेला नाही.

Web Title: Use technology to investigate crimes