शासकीय रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षकच नाही

By Admin | Updated: October 4, 2015 00:41 IST2015-10-04T00:41:04+5:302015-10-04T00:41:04+5:30

विस्तीर्ण परिसर असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात सुरक्षा रक्षकच नसल्यामुळे येथील परिचारिकांचा जीव धोक्यात आहे.

There is no security guard in the government hospital premises | शासकीय रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षकच नाही

शासकीय रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षकच नाही

परिचारिका संकटात : नर्सेस असोसिएशनने वरिष्ठांना पाठविले निवेदन
यवतमाळ : विस्तीर्ण परिसर असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात सुरक्षा रक्षकच नसल्यामुळे येथील परिचारिकांचा जीव धोक्यात आहे. या समस्येबाबत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने वरिष्ठांकडे निवेदन पाठविले आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरक्षा रक्षकाचे पदच नाही. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे महाविद्यालय परिसरात परिचारिका, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. १२७ एकराचा हा विस्तीर्ण परिसर सध्या झाडाझुडपांनी व्यापला आहे. त्यातच परिचारिका, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे कॉर्टरही आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
एकीकडे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना चौकीदारी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. मात्र त्यांची संख्याही अपुरी पडत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष मात्र परिचारिकांना दररोज पत्कारावा लागतो.
या परिसरात परिचारिकेची पर्स चोरून नेण्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न नुकताच घडला. त्यामुळे महाविद्यालय परिसरातील प्रशिक्षणार्थी, परिचारिका, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक हे सारेच दहशतीत वावरत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी या परिसरात कायम स्वरुपी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे अशी मागणी नर्सेस असोसिएशनने केली आहे. मागणीचे निवेदन वैद्यकीय शिक्षण आरोग्य मंत्री, डीएमईआर संचालक, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता आदींना देण्यात आले आहे. सुरक्षारक्षकांची नेमणूक न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: There is no security guard in the government hospital premises