१६ लाखांच्या विदेशी दारूची चोरी

By Admin | Updated: May 31, 2015 02:13 IST2015-05-31T02:13:07+5:302015-05-31T02:13:07+5:30

स्थानिक पांढरकवडा रोडवरील डोर्ली शिवारात असलेले गोदाम फोडून रात्री चोरट्यांनी १६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली.

Theft of 16 million foreign liquor | १६ लाखांच्या विदेशी दारूची चोरी

१६ लाखांच्या विदेशी दारूची चोरी

तीन गोदाम फोडले : पांढरकवडा रोडवरील डोर्लीची घटना
यवतमाळ : स्थानिक पांढरकवडा रोडवरील डोर्ली शिवारात असलेले गोदाम फोडून रात्री चोरट्यांनी १६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली. या घटनेने शहरात व्यापारी-व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
रमेश मंगतानी, गोपाल बख्तीयार हे येथील होलसेल दारू विक्रेता आहेत. त्यांनी डोर्ली येथे बी.सी. मोर यांचे गोदाम भाड्याने घेतले आहे. या गोदामातून दरदिवशी माल काढून तो किरकोळ विक्रेत्यांकडे पाठविला जातो. गुरुवारीसुद्धा असाच माल या गोदामातून काढला गेला. शनिवारी पुन्हा दारूचा माल काढण्यासाठी या विक्रेत्यांची माणसे गेली असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. एका गोदामात खिडकी तोडून, तर दुसऱ्या गोदामात भिंत फोडून चोरटे आत घुसले. एका गोदामातून ११ लाख तर दुसऱ्या गोदामातून पाच लाख अशी एकूण १६ लाख रुपयांची दारू चोरीला गेली. त्या शेजारी असलेले जयस्वाल यांचे गोदामही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. घटनेची फिर्याद यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी वाहनांच्या चाकाचे ठसे आढळून आले. रमेश मंगतानी यांचे यापूर्वीसुद्धा आर्णी रोडवरील गोदाम दोनवेळा फोडले गेले होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Theft of 16 million foreign liquor