बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 00:00 IST2026-01-02T23:59:02+5:302026-01-03T00:00:04+5:30
Savitribai Phule Statue In Yavatmal: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच २ जानेवारी रोजी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक येथे सावित्रीबाईंचा पुतळा उभा केल्याचे आढळून आले.

बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
यवतमाळ: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शनिवार, ३ जानेवारी रोजी आहे. या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच २ जानेवारी रोजी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक येथे सावित्रीबाईंचा पुतळा उभा केल्याचे आढळून आले. या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले. ही वार्ता नगरपालिका प्रशासनाला कळताच खळबळ उडाली. पुतळा बसविण्यासाठी कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत नगरपरिषद प्रशासनाने पोलिस संरक्षणात शुक्रवारी रात्रीच पुतळा हटविण्याची मोहीम हाती घेतली.
महापुरुषांचा पुतळा बसविण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. ही प्रक्रिया अतिशय किचकट व वेळखाऊ आहे. शक्यतोवर नव्याने पुतळा बसविण्यासाठी परवानगी मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा अज्ञातांनी स्टेट बँक चौक येथे रात्रीतून उभा केला. त्यानंतर अनेक अनुयायी या ठिकाणी सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. अर्धाकृती पुतळा चबुतरा बांधून त्यावर स्थापित करण्यात आला होता. हा पुतळा कोणी, केव्हा कसा बसविला असे अनेक प्रश्न कायम आहे. पुतळा स्थापन करण्यात आल्याचे माहीत होताच तेथे प्रशासनाकडून तातडीने पोलीस पथक पाठविण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा स्टेट बँक चौक परिसरात बसविण्यात आला. हा पुतळा अनधिकृत असून, तो हटविण्याची कारवाई केली जात आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, नगरपरिषद मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी म्हटले.नगरपरिषद प्रशासनाकडून अनधिकृत पुतळा हटविण्याची कारवाई केली जात आहे. यासाठी त्यांनी पोलिस संरक्षण मागितले आहे. तेथे बंदोबस्त लावला आहे, असे यवतमाळ शहराचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी म्हटले.