लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील चार गावांतील मजुरांच्या बँक खात्यांतून केवळ तीन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असताना या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे पसार झाला आहे. दरम्यान या खात्यांचा वापर ऑनलाईन गेमिंगसाठी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पांढरकवडा शाखेतील ट्रान्ॉक्शन स्टेटमेंटवरून या मजुरांच्या खात्यात १४ मार्चपासून ३० जूनदरम्यान सतत मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यवहाराचा काळा पैसा हेरफेर करण्यासाठी गरीब मजुरांचे पॅनकार्ड नसतानाही बँक खाते उघडण्यात आले. या खात्यात तीन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. मात्र तक्रार झाल्यानंतरही स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यात आलेली नाही. आतापर्यंत तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पांढरकवडा पथकाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांकडून ट्रान्ॉक्शन झालेल्या खात्याचे स्टेटमेंट घेत चोपन येथील आठ मजुरांचा जबाब सोमवारी नोंदवला.
मुख्य सूत्रधार मोकाट, पोलिस शांत?मयूर चव्हाण आणि त्याचा साथीदार मनोहर राठोड या दोघांनी रोजगार हमी योजनेचे आमिष दाखवून अनेक मजुरांची ओळख गोळा केली आणि त्यांच्याच नावाने खाती उघडली. या दोघांना भद्रावतीमधून मदत करणारे राहुल शेडमाके व अल्ताफ अकबानी यांची नावे समोर आली असून, त्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कुठल्याही आरोपींचा ठोस शोध घेतला गेलेला नाही. पोलिस फसवणूक झालेल्या मजुरांचा जबाब घेण्यात वेळ घालवत आहेत.
पोलिसांनी फसवणूक झालेल्या युवकांकडेच पैसे कुठून आले, कुठे गेले याची उलट चौकशी सुरू केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात भद्रावतीच्या सूत्रधारासाठी यवतमाळातील दलाल मदतीला आला होता. त्या दलालानेच सहायक निरीक्षकाशी संधान साधून ६३ लाख रुपये वसूल करण्याचा प्रयत्न चालवला होता. या गुंतागुंतीच्या प्रकरणात पोलिसांची भूमिका कायम संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पॅनकार्ड नसताना लाखोंचे व्यवहार कसे?
- झिरो बॅलन्सवर उघडलेल्या खात्यात कमीत कमी १८ लाखांचा व्यवहार झाला आहे. या व्यवहारावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाने एकदाही संशय घेतला नाही. अशा पद्धतीने २० जणांच्या खात्यातून आर्थिक उलाढाल झाली आहे. यूपीआयद्वारे पैसे जमा झाले आणि त्याच पद्धतीने ते काढून घेण्यात आले.
- या व्यवहारात यूपीआयची मर्यादा का लागली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मजुरांकडे पॅनकार्ड नाही, त्यानंतरही त्यांच्या सेव्हिंग अकाऊंटमधून तीन महिन्यांतच लाखो व कोट्यवधींचे व्यवहार झाले कसे?
- हा प्रश्न पोलिसांनी बँक व्यवस्थापकाकडे उपस्थित केला नाही. या काळ्या पैशांच्या व्यवहारात सर्वांचेच हात गुंतले असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
योजनेच्या लाभाखाली केले कोट्यवधींचे व्यवहारपांढरकवडा तालुक्यातील चोपन येथून या प्रकरणाला वाचा फुटली. गावातील मयूर चव्हाण व साथीदार मनोहर राठोड याने गावातील अनेकांना तुमची कागदपत्रे द्या, रोहयो योजनेतून काम देतो, असे सांगितले. कागदपत्र गोळा करून परस्पर त्यांच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाती उघडली आणि या खात्यातून यूपीआय व ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कोट्यवधींचा व्यवहार केला. आता या प्रकरणात पॅनकार्ड आणि मोबाईल क्रमांकाशिवाय खाती कशी काढली असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील मुख्य सूत्रधार अद्यापही पुढे आलेला नाही.