दारू-जुगार व्यावसायिकांच्या शुभचिंतकांवर एसपींचा ‘वॉच’

By Admin | Updated: May 24, 2015 00:17 IST2015-05-24T00:17:32+5:302015-05-24T00:17:32+5:30

जिल्ह्यातील दारू-जुगार व अन्य अवैध व्यावसायिकांच्या खाकी वर्दीतील शुभचिंतकांवर आता नवनियुक्त जिल्हा पोलीस ....

SPA 'watch' on well wishers of liquor-gambling professionals | दारू-जुगार व्यावसायिकांच्या शुभचिंतकांवर एसपींचा ‘वॉच’

दारू-जुगार व्यावसायिकांच्या शुभचिंतकांवर एसपींचा ‘वॉच’

‘लोकमत’ वृत्ताची दखल : भानगडी नको, सांभाळून राहण्याचा ठाणेदारांना सल्ला
यवतमाळ : जिल्ह्यातील दारू-जुगार व अन्य अवैध व्यावसायिकांच्या खाकी वर्दीतील शुभचिंतकांवर आता नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचा वॉच राहणार आहे.
‘नवे साहेब आले हो, धंदे बंद करा!’ असा संदेश पोहोचवून अवैध व्यावसायिकांना अलर्ट केले गेले होते. ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात या संबंधीचे सविस्तर वृत्त छायाचित्रानिशी प्रकाशित केले. या वृत्ताची एसपी सिंह यांनी दखल घेतली. कार्यालयात येताच त्यांनी ‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रण बोलावून त्यावर लक्ष केंद्रीत केले. मावळत्या काळात चालणारा शिरपूर पॅटर्नही त्यांनी समजावून घेतला. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयात संजय दराडे यांना निरोप आणि सिंह यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची छोटेखानी बैठक घेतली. त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुणाकडे किती कर्मचारी आहेत, किती कमी आहेत, घरे, वेतन, भत्ते याच्या समस्या व अन्य अडीअडचणी काय यावर चर्चा केली. सोबतच ‘बाकी भानगडी आपल्याला चालणार नाहीत, सांभाळून रहा’ अशा शब्दात आपली भूमिकाही स्पष्ट केली. अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही असे सांगताना कारवाईचे संकेत दिले गेल्याने अवैध धंद्यांना खतपाणी घालणारे पोलीस अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहे. एसपींची ही भूमिका आणखी सविस्तर स्पष्ट होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना क्राईम मिटींगची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: SPA 'watch' on well wishers of liquor-gambling professionals