सोयाबीन काळे ठिक्कर, कापसाची बोंडे सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST2021-09-27T05:00:00+5:302021-09-27T05:00:16+5:30

अगदी हाती येणारे पीक पावसाने मातीमोल केले. अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच ओला झाला असून सोयाबीनदेखील काळे पडल्याने उत्पन्नात फार मोठी घट येण्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरीप हंगामाची सोय केली. यंदा चांगले उत्पादन होईल, असा अंदाज होता. शेतकऱ्यांनाही तीच आशा होती. पिकाची अवस्था अतिशय चांगली होती. मात्र नियतीला ते पाहावले नाही.

Soybeans blackened, cotton buds rotted | सोयाबीन काळे ठिक्कर, कापसाची बोंडे सडली

सोयाबीन काळे ठिक्कर, कापसाची बोंडे सडली

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळ्या ठिक्कर पडल्या आहेत, तर कापसाची बोंडेदेखील सडून गेली आहेत. हातात येणारे पीक डोळ्यासमोर मातीमोल झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. वणी तालुक्यात या पावसामुळे पिकांचे नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. 
वणी उपविभागातील वणीसह मारेगाव या दोन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात कापूस फुटून होता, तर सोयाबीन कापणीवर आले होते. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून त्याच्या गंज्या शेतात उभ्या केल्या होत्या. अशातच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आणि शेतकरी हादरून गेला. 
अगदी हाती येणारे पीक पावसाने मातीमोल केले. अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच ओला झाला असून सोयाबीनदेखील काळे पडल्याने उत्पन्नात फार मोठी घट येण्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरीप हंगामाची सोय केली. यंदा चांगले उत्पादन होईल, असा अंदाज होता. शेतकऱ्यांनाही तीच आशा होती. पिकाची अवस्था अतिशय चांगली होती. मात्र नियतीला ते पाहावले नाही. या भागात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. २० सप्टेंबरच्या रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. २१ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. अनेक शेतांमधील पिकात अजूनही पाण्याचे डबके साचून आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य आजाराचे आक्रमण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 
अर्ली व्हरायटीची बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. दोन वर्षांपूर्वी ऐन पिके काढणीवर असताना वणी तालुक्यात असाच पाऊस झाला. त्यावेळीदेखील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. यंदा त्याहीपेक्षा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी निसर्गाच्या प्रकोपात सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागातर्फे पंचनामे केले जातात. मात्र नुकसान लाखोत असले तरी मदत मात्र पाच ते १० हजारांची दिली जाते. 
निसर्गाच्या या चक्रात शेतकरी सातत्याने भरडला जात आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही, दुसरीकडे निसर्गाच्या प्रकोपात पिकांची माती होते. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. यावर्षी पिकांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले, तेवढा मोबदला सरकारने द्यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

औंदाही पावसानं चांगलीच सोय लावली जी...! 
- कापूस, सोयाबीन पिकाची स्थिती चांगली होती. मात्र परतीच्या पावसानं पिकाची चांगलीच सोय लावली जी...! आता आम्हा शेतकऱ्यांनी जगाचं तरी कसं, असा केविलवाणा प्रश्न मांगरूळ येथील शेतकरी प्रभाकर डाखरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

 

Web Title: Soybeans blackened, cotton buds rotted

टॅग्स :agricultureशेती