४०० वर परिपक्व सागवानांची कत्तल

By Admin | Updated: October 6, 2014 23:19 IST2014-10-06T23:19:30+5:302014-10-06T23:19:30+5:30

राखीव वनातील चारशेवर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून कोट्यवधी रूपयांचा लाकूडसाठा तस्करांनी लंपास केला. हा गंभीर प्रकार जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमध्ये उघडकीस आला.

Slaughter of mature sastans on 400 | ४०० वर परिपक्व सागवानांची कत्तल

४०० वर परिपक्व सागवानांची कत्तल

यवतमाळ : राखीव वनातील चारशेवर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून कोट्यवधी रूपयांचा लाकूडसाठा तस्करांनी लंपास केला. हा गंभीर प्रकार जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमध्ये उघडकीस आला. मात्र कारवाईच्या भीतीपायी वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेची वाच्यता न करता सारवासारव चालविली असल्याची माहिती आहे.
जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमधील राखीव वनातील कक्ष क्र. २१२ हे घाटंजी आणि नवनिर्मित वडगाव (जंगल) या दोन वनपरिक्षेत्रांच्या सीमेवर आहे. हद्दीच्या वादातून संबंधित तीनही वनपरिक्षेत्रांनी या राखीव वनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत दुर्गम भागात असलेल्या या जंगलातील तब्बल चारशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. तसेच वाहनाद्वारे टप्प्याटप्प्याने कोट्यावधी रूपयांचा लाकूडसाठा लंपास केला. हा लाकूडसाठा आंध्र प्रदेशात तस्करी झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. असे असताना जोडमोहाच नव्हे तर घाटंजी आणि वडगाव (जंगल) वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचारी या गंभीर प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे दर्शवितात. चारशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून त्याची तस्करी करणे, हे काही एक दोन दिवसाचे काम नाही. सुमारे महिनाभर मार्तंडा येथील जंगलात परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल केली गेली असावी असा, अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात जोडमोहा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांना कुठलीच माहिती नसल्याचे सांगण्यात. त्यानंतर मात्र चौकशीत कत्तल आणि तस्करीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरही हद्दीचा वाद करून नेमके जंगल कुणाचे याची पडताळणी करण्यात आली. मात्र अद्यापही कारवाईच्या भीतीने या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली नसल्याचे खुद्द वन विभागातूनच सांगण्यात आले. विशेष असे की, या बिटच्या संरक्षणाची जबाबदारी असलेला वनरक्षक अपंग आहे. तरी त्याला दुर्गम भागात नेमण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Slaughter of mature sastans on 400