जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या लांबण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST2021-05-08T05:00:00+5:302021-05-08T05:00:15+5:30
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील साडेसात हजार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागलेले आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी सुधारित धोरणही जाहीर केले. त्यानुसार ३१ मेपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी मे महिन्यापूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रिक्त पदे, सेवाज्येष्ठता याद्या, संवर्गनिहाय याद्या, जिल्ह्यातील अवघड गावांची यादी, आदी माहिती तयार ठेवणे अपेक्षित होते.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या लांबण्याची चिन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदशिक्षकांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या यंदाही कोरोनामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने यंदा ३१ मेपर्यंत बदल्या करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र, ८ मे उजाडूनही याबाबत राज्य स्तरावरून जिल्हा परिषदेला कोणताही कार्यक्रम मिळालेला नाही, तर दुसरीकडे कोरोना निस्तरल्यास दिवाळीनंतरच बदल्यांची प्रक्रिया पार पडली जाईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील साडेसात हजार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागलेले आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी सुधारित धोरणही जाहीर केले. त्यानुसार ३१ मेपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी मे महिन्यापूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रिक्त पदे, सेवाज्येष्ठता याद्या, संवर्गनिहाय याद्या, जिल्ह्यातील अवघड गावांची यादी, आदी माहिती तयार ठेवणे अपेक्षित होते. तसेच राज्य स्तरावरून शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक होते. परंतु, अजूनही अशी सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांचा जीव टांगणीला लागलेला आहे, तर दुसरीकडे, काही शिक्षक संघटनांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करून बदल्यांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दिवाळीनंतरच ही प्रक्रिया केली जाण्याची शक्यता मंत्रिमहोदयांनी वर्तविल्याचे या संघटनांकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात कोरोनाची वाढती दु:स्थिती आणि कार्यालयांमधील केवळ १५ टक्के उपस्थिती बघता प्रक्रिया लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षीही अशाच पद्धतीने बदल्या जाहीर होऊन कोरोनाच्या कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बदली प्रक्रियेबाबत आपली पूर्ण तयारी झाली आहे. रिक्त पदांच्या याद्या, सेवाज्येष्ठता याद्या तयार आहे. मात्र, अवघड क्षेत्रांबाबत केवळ पेसा व नक्षलग्रस्त क्षेत्राची माहिती आली. मात्र, बांधकाम, पोलीस, बीएसएनएल, आदींकडून माहिती आलेली नाही. ती सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय बदल्यांबाबत अद्याप राज्य स्तरावरून कोणताही कार्यक्रम देण्यात आलेला नाही.
- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी
यंदा कोणत्याही परिस्थितीत बदल्या रद्द होऊ देणार नाही. या जीआरनुसार सर्व प्रक्रिया ऑनलाईन करावी लागणार असल्याने कोरोनाबाबत अडचण येण्याची शक्यताच नाही. तरीही दक्षता म्हणून आम्ही सीईओंची भेट घेऊन जीआरनुसार प्रक्रिया पूर्ण करण्याचे साकडे घातले आहे. इतर जिल्हा परिषदांमध्ये प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
- दिवाकर राऊत,
जिल्हाध्यक्ष, इब्टा शिक्षक संघटना