राकाँने काढला शिवसेनेचा विधान परिषदेतील वचपा

By admin | Published: March 22, 2017 12:04 AM2017-03-22T00:04:47+5:302017-03-22T00:04:47+5:30

६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच सर्वाधिक २० जागा जिंकल्या.

Shiv Sena's Legislative Assembly Vachapa withdrew | राकाँने काढला शिवसेनेचा विधान परिषदेतील वचपा

राकाँने काढला शिवसेनेचा विधान परिषदेतील वचपा

Next

जिल्हा परिषद : राष्ट्रवादीने दगाफटका केल्याची शिवसैनिकांमध्ये भावना
यवतमाळ : ६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच सर्वाधिक २० जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतही भगवा फडकणार असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात अगदी उलटेच चित्र पहायला मिळाले.
सोमवारी शिवसेना व राष्ट्रवादीने युती झाल्याचे सांगत सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा संयुक्त पत्रपरिषदेत केली होती. परंतु आज प्रत्यक्ष निवडणूक निकालाअंती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या या भूमिकेपासून घुमजाव करीत काँग्रेस व भाजपाला सभागृहात साथ दिली. त्यामुळेच शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. बदललेल्या या भूमिकेमागे अलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे राजकारण असल्याचे बोलले जाते. यवतमाळची विधान परिषद संदीप बाजोरिया यांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. या निवडणुकीत पुन्हा बाजोरिया नशीब आजमविण्यासाठी रिंगणात उतरले होते. परंतु शिवसेनेने ऐनवेळी उस्मानाबादवरून आर्थिक दृष्ट्या अतिशय भक्कम असलेल्या प्रा. तानाजी सावंत यांना यवतमाळच्या निवडणूक रिंगणात उतरविले. अपेक्षेनुसार प्रा. तानाजी सावंत विजयी झाले. याच पराभवाचा बदला राष्ट्रवादीने शिवसेनेला अखेरपर्यंत बेसावध ठेऊन जिल्हा परिषदेत काढल्याचे मानले जाते. शिवसेनेने रविवारी विधान परिषदेतील ‘हिशेब’ पूर्ण करूनही राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत दगाफटका केल्याने राजकीय गोटात व खुद्द शिवसैनिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते.
राष्ट्रवादीने धोका दिल्याची भावना शिवसेनेच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. विधान परिषदेची जागा मिळवून शिवसेनेने जिल्ह्यात आपली राजकीय ताकद वाढविली असली तरी प्रा. तानाजी सावंत यांचा जिल्ह्यात शिवसेनेला नेमका किती फायदा होणार याबाबत शिवसैनिकांमध्येच साशंकता आहे. कारण विधान परिषदेचे निकाल लागल्यानंतर ‘मातोश्री’वर आशीर्वादासाठी गेलेले प्रा. तानाजी सावंत अद्यापही जिल्ह्यात परतले नाही. ते पाहता प्रा. तानाजींच्या विधान परिषद सदस्यत्वापेक्षा शिवसेनेला सत्ता व पक्षबांधणीच्या दृष्टीने जिल्हा परिषद अधिक महत्वाची ठरली असती, असा सेनेच्या गोटातील सूर आहे. (प्रतिनिधी)

शिवसेनेची गर्जनाच, भाजपाची प्रत्यक्ष कृती
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला आडवे करण्याची तसेच १८ जागा मिळाल्या असल्या तरी सत्तेपासून दूर ठेवण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्यावर भाजपाच्या कोणत्याही नेत्याने कुठेच उत्तर दिले नाही. अप्रत्यक्ष सेनेचे विधान बेदखल ठरविले. परंतु प्रत्यक्षात सेनेच्या या गर्जनेपासूनच भाजपातील नेते मंडळी सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या कामाला लागली होती. अखेरपर्यंत जोडतोड व व्यूहरचना करून भाजपाने कोणतीही गर्जना न करता शिवसेनेला प्रत्यक्ष सत्तेपासून दूर ठेवण्याची कृती यशस्वी करून दाखविली.
भावाला उपाध्यक्ष बनविण्याचे स्वप्न भंगले
शिवसेनेचे नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपले बंधू विजय राठोड यांना निवडून आणले. त्यांना उपाध्यक्ष बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. उपाध्यक्ष पदासाठी राठोड यांचे नामांकनही दाखल करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने दगाफटका केल्याने संजय राठोड यांचे भावाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष करण्याचे स्वप्न भंगले.

 

Web Title: Shiv Sena's Legislative Assembly Vachapa withdrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.