शाहरुख-निलोफर हत्येने शैक्षणिक वर्तुळ हादरले

By Admin | Updated: September 11, 2014 23:50 IST2014-09-11T23:50:41+5:302014-09-11T23:50:41+5:30

दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी. अभ्यासात अत्यंत हुशार. सर्वांशी मिळवून मिसळून राहणारे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून भविष्याचे स्वप्न रंगविणारे. मात्र या स्वप्नाला कुणाची तरी दृष्ट लागली.

The Shahrukh-Nilohar murder sparked an educational circle | शाहरुख-निलोफर हत्येने शैक्षणिक वर्तुळ हादरले

शाहरुख-निलोफर हत्येने शैक्षणिक वर्तुळ हादरले

माहूरची घटना : रहस्य कायम, मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही
अशोक काकडे/अविनाश खंदारे - पुसद/उमरखेड
दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी. अभ्यासात अत्यंत हुशार. सर्वांशी मिळवून मिसळून राहणारे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून भविष्याचे स्वप्न रंगविणारे. मात्र या स्वप्नाला कुणाची तरी दृष्ट लागली. माहूरच्या निर्मुनष्य रामगड किल्ल्यात दोघांचेही गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. गुरुवारी उघडकीस आलेल्या शाहरुख आणि निलोफरच्या हत्याकांडाने जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळासह संपूर्ण समाजमन हादरले.
माहूर येथील ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या बारुदखाण्याजवळ गुरुवारी सकाळी शाहरुख आणि निलोफरचा मृतदेह आढळून आला. या दोघांचीही हत्या धारदार शस्त्राने गळा चिरुन आणि दगडाने ठेचून करण्यात आली होती. हे दोघेही बुधवारी इंडिक व्हिस्टा कारने माहूर येथे आले होते. त्यानंतर रामगड किल्ल्यावर गेले. परंतु गुरुवारी सकाळी त्यांचे मृतदेहच आढळून आले. निलोफर मारिया खालीद बेग मिर्झा ही पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. शिक्षणात अत्यंत हुशार आणि महाविद्यालयात सर्वांशी एकोप्याने राहणारी होती. बुधवारी नेहमीप्रमाणे ती महाविद्यालयात गेली. सायंकाळी ५.३० पर्यंत नेहमी प्रमाणे घरी येणारी निलोफर घरीच आली नाही. तिचा मोबाईल लावला असता तो स्वीच आॅफ येत होता. घरात एकुलती एक मुलगी असलेली निलोफर घरी न आल्याने पालक चिंताग्रस्त झाले. तिचा शोध सुरू केला. परंतु कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. वडिलांनी रात्रीच पुसद शहर पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेतले असता रात्री १ वाजताच्या सुमारास तिचे लोकेशन माहूरच्या रामगड किल्ल्यावर आढळून आले आणि तेथून शोधाशोध सुरू झाली. तो गुरुवारी सकाळी तिचा एका तरुणासोबत मृतदेहच आढळून आला.
शाहरुख पठाण हा उमरखेड शहरातील व्यावसायिक फिरोज पठाण यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने युनिर्व्हसल इंग्लिश मीडियम स्कूलमधून दहावीची परीक्षा ७० टक्के गुणाने उत्तीर्ण केली. त्यानंतर पुसदच्या डॉ.एन.पी. हिराणी तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका घेतली. दोन दिवसापूर्वीच त्याने यवतमाळच्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत द्वितीय वर्षात प्रवेश घेतला होता. अतिशय शांत स्वभावाचा म्हणून तो मित्र परिवारात परिचित होतो. महाविद्यालयात गरीब मित्रांना तो शैक्षणिक शुल्क आणि मेससाठी सतत पैशाची मदतही करीत होता. त्याच्या या स्वभावामुळेच तो सर्वांचा प्रिय होता. यवतमाळात प्रवेश घेतला असला तरी त्याचे शिक्षण पुसदला झाल्याने तो बुधवारी पुसद येथे गेला.
गरीबांच्या शिक्षणासाठी शाहरुखची होती धडपड
उमरखेड शहरातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाहरुखची नेहमी धडपड असायची. त्याने रहीमनगर, नागापूर (रुपाळा) या भागातील पहिली ते पाचवीच्या ५० मुलांना शिकविण्यासाठी खासगी शिक्षक ठेवला होता. या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च तो करीत होता. तसेच अभियांत्रिकी शिक्षण घेतानाही तो गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरायचा. एवढेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना मेसच्या जेवणासाठीही दरमहा पैसे देत होता. शिक्षणावर मनापासून प्रेम करणारा शाहरुखची हत्या झाल्याने प्रत्येक जण हळहळत होता.

Web Title: The Shahrukh-Nilohar murder sparked an educational circle