मुलींच्या शिक्षणाला ज्येष्ठांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:38 IST2018-07-29T23:36:29+5:302018-07-29T23:38:01+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांनी मदतीचा हात दिला आहे. गरजू ५५ विद्यार्थिनींना शनिवारी शिष्यवृत्तीच्या रूपाने पावणे दोन लाखांची मदत वितरित करण्यात आली.

मुलींच्या शिक्षणाला ज्येष्ठांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांनी मदतीचा हात दिला आहे. गरजू ५५ विद्यार्थिनींना शनिवारी शिष्यवृत्तीच्या रूपाने पावणे दोन लाखांची मदत वितरित करण्यात आली.
येथील निवृत्त अभियंता मित्रमंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे परीक्षा घेवून या शिष्यवृत्तीकरिता गुणवंत विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. प्रत्येकी तीन हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात आली. विविध क्षेत्रातील सेवानिवृत्तांसह महिलांनीही पुढाकार घेत या उपक्रमासाठी एक लाख ७१ हजार रुपयांची रक्कम गोळा केली. शनिवारी निवृत्त अभियंता भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवृत्त अभियंता मंडळाचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार, नेत्रतज्ज्ञ राहूल डुबेवार, निवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे, सुधाकर वाके, मंडळाचे उपाध्यक्ष मधुकर चर्जन, सचिव वसंत पांडे, राजलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तायडे, जगदीश पोदुटवार, डॉ.सुरेंद्र पद्मावार उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक तिखे यांनी केले. हा उपक्रम २००० मध्ये अभियंता उदय भास्करवार यांनी प्रारंभ केला. त्यात अनेकांनी सहभाग घेत हा उपक्रम पुढे नेला आहे. आज अभियंत्यांसह विविध क्षेत्रातील २५ मान्यवर यात जुळले आहे.