जिल्ह्यातील शाळा पाहताहेत विद्यार्थ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST2021-07-19T05:00:00+5:302021-07-19T05:00:46+5:30

कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता.

Schools in the district are waiting for students | जिल्ह्यातील शाळा पाहताहेत विद्यार्थ्यांची वाट

जिल्ह्यातील शाळा पाहताहेत विद्यार्थ्यांची वाट

ठळक मुद्देआठवी ते बारावीतील विद्यार्थी संख्या एक लाखांवर, केवळ २७ हजार विद्यार्थीच शाळेत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तब्बल दीड वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या वर्गांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला असला तरी अद्यापही कोरोनाची भीती कायम असल्याचेच दिसून येते. जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या एक लाख दहा हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच शाळेत पोहोचले आहेत.
कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता. १५ जुलै रोजी आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण ९८५ शाळांपैकी ५०२ शाळा सुरू झाल्या, तर ४८३ शाळांनी अद्यापही शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आठवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या ११ हजार ४७९ एवढी आहे. यातील ५०२ शाळा सुरू झाल्या असून या शाळेत केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच प्रत्यक्ष आल्याने विद्यार्थ्यांची मोठी संख्या शाळा सुरू होऊनही शाळेपासून अद्यापही दूर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात ८९९ शाळांची संख्या असून त्यातील १८२ शाळा सुरू झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीचे एक लाख ९५ हजार ८०७ विद्यार्थी आहेत. यातील केवळ चार हजार ७४९ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. तर वर्धा जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीच्या ३५६ शाळा असून त्यातील केवळ ३७ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांतील ६५ हजार ४८७ पैकी केवळ ९८७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झालेले आहेत.

उमरखेडमध्ये सर्वाधिक शाळा
- आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्यापही ४८३ शाळांचे दरवाजे बंद आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ६२ शाळा उमरखेड तालुक्यात सुरू झाल्या आहेत. महागाव तालुक्यात ५२, यवतमाळ १७, राळेगाव ३५, पांढरकवडा ४९, वणी ३७, मारेगाव २५, बाभूळगाव २६, घाटंजी ४९, आर्णी ३२, नेर २७ तर दारव्हा तालुक्यात ३० शाळा सुरू झाल्या आहेत.
 

Web Title: Schools in the district are waiting for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.