विहिरी वाचवा, टँकर सज्ज ठेवा

By Admin | Updated: October 4, 2015 00:36 IST2015-10-04T00:36:48+5:302015-10-04T00:36:48+5:30

तहान लागण्यापूर्वीच... : उन्हाळ्यातील टंचाईसाठी आराखडा तयार

Save the well, keep tankers ready | विहिरी वाचवा, टँकर सज्ज ठेवा

विहिरी वाचवा, टँकर सज्ज ठेवा

तहान लागण्यापूर्वीच... : उन्हाळ्यातील टंचाईसाठी आराखडा तयार
यवतमाळ : दरवर्षी उन्हाळ्यात चटके जिवघेणे ठरू लागल्यानंतर टंचाई निवारणाचे नियोजन सुरू होते. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार यंदा टाळण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या नव्या विहिरींचे खोदकाम आणि जुन्या विहिरीतील अनिर्बंध उपशावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय, येत्या उन्हाळ्यात गरज भासल्यास शासकीय टँकर सज्ज ठेवण्याचे निर्देशही आतापासूनच देण्यात आले आहेत.
पाणीटंचाईच्या उपाययोजना दरवर्षी केवळ ३० जूनपर्यंत राबविण्यात येतात. यंदा मात्र, या उपाययोजना वर्षभर अमलत येणार आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात काहीसा दिलासादायक पाऊस झाला असला, तरी येत्या काळात भीषण टंचाईचे संकेत आहेतच. त्यासाठी प्रशासनाने पाण्याचे स्रोत काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका स्रोतापासून ५०० मीटर अंतरात दुसरी विहीर खोदण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच अस्तित्वातील विहिरीतून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोण्यात्याही कारणासाठी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त किंवा संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी गावनिहाय स्वतंत्र आराखडे लवकरच तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी सरासरीपेक्षा २ मीटरपेक्षा जेथील पाणीपातळी खाली गेली आहे, अशा गावांची लवकरच यादी तयार होणार आहे. तेथील जलस्रोत बळकटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विंधन विहिरींची वेळोवेळी दुरुस्ती करून त्या सदैव चालू स्थितीत ठेवण्याचेही निर्देश आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अशावेळी शासकीय टँकरच वापरण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी झाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून जे टँकर पुरविले जातात, ते सुस्थितीत नसतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला नाईलाजाने खासगी टँकरचाच वापर करावा लागतो. यंदा, वेळेवर अशी धावपळ होऊ नये म्हणून सर्व शासकीय टँकर सुस्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच टँकरने पाणीपुरवठा करताना अनेकदा शासनाची आर्थिक फसवणूक केली जाते. ठरलेल्या फेऱ्यांपेक्षा अधिक फेऱ्या झाल्याचे दाखवून जादा पैसे लाटले जातात. तसेच गावात एखाद्या ठरावीक घरापुढेच टँकर उभा करून अनेक गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचेही प्रकार पुढे आले आहेत. हा गैरप्रकार टाळण्यासाठी आता पाण्याच्या टँकरवरही जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावासाठी टंचाई निवारणाचा कमीत कमी खर्चाचा कृती आराखडा तयार करून पैशाची आणि पाण्याचीही काटकसर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Save the well, keep tankers ready