"संजय राऊत मातोश्रीचे घरगडी, अपक्ष आमदार स्वाभिमानी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:52 IST2022-06-12T14:50:38+5:302022-06-12T14:52:58+5:30
अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत, ते स्वाभिमानी आहेत, असा उपरोधिक टोला आमदार संजय कुटे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला.

"संजय राऊत मातोश्रीचे घरगडी, अपक्ष आमदार स्वाभिमानी"
यवतमाळ - राज्यसभा निवडणुकीतील भाजप विरुद्ध शिवसेनेच्या महायुद्धात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. यात महाराष्ट्रातील सहापैकी तीन जागांवर भाजपचा विजय झाला, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली. शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात झालेल्या थेट सामन्यात भाजपचा विजय झाला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही अपक्ष आमदारांची नावे सांगत भाजपला मतदान केल्याचा आरोप केला. त्यावरुन, आता भाजप नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. अपक्ष आमदार हे कोणाचेही घरगडी नाहीत, असे माजीमंत्री संजय कुटे यांनी म्हटले आहे.
अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत, ते स्वाभिमानी आहेत, असा उपरोधिक टोला आमदार संजय कुटे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला. संजय राऊत हे मातोश्रीचे आणि विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींचे घरगडी असेल, असेही ते म्हणाले. संजय राऊत आणि वडेट्टीवार यांच्या व्यक्तव्यावर आचारसंहिता भंगाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची का नाही ते अपक्ष आमदार ठरवणार आहेत. मात्र, आमदारांचा निधी कुणीही थांबवू शकत नाही, आणि तो निधी कसा मिळवायचा हे अपक्ष आमदारांना माहीत आहे. अपक्ष आमदार हे स्वाभिमानी आहेत, अशा शब्दात यवतमाळ येथे आले असता आमदार संजय कुटे यांनी संजय राऊतांवर तोफ डागली.
'संजय राऊतांना सत्तेचा माज'
राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनिल बोंडे नागपूरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनता आता महाविकास आघाडीला वैतागली आहे. महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही त्यांना वैतागले आहेत. संजय राऊत यांना तर सत्तेचा माज आलाय, ते द्वेषाने पेटलेले आहेत, म्हणूनच त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला. अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा त्यांनी केला," अशी बोचरी टीका बोंडे यांनी केली आहे.
राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला - सोमय्या
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. ते अधिकृत पक्षाचे आमदार असल्याने राज्यसभेला मतदान करताना पक्षाच्या प्रतोदाला मताची चिठ्ठी दाखवून ते द्यावे लागते. परंतू अपक्षांना कोणीही विचारू शकत नाही. त्यांनी कोणाला मतदान केले हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना अपक्ष आमदारांनी कोणाला मत दिले हे संजय राऊत कसे सांगू शकतात. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.